१.
बैलपोळ्यापाठ ये, येवून जा गे मारबत
रोगराई संकटे घेऊन जा गे मारबत
द्रव्यलोभी संधिसाधू भामटे ने सोबती
जनहिता जे चांगले ठेवून जा गे मारबत
थंड पडली चूल माझी रोजगारी थांबली
मी म्हणू कोण्यामुखे जेवून जा गे मारबत
हे विजेचा शॉक देती दरमहा बडग्ये मला
खंडणी की विजबिले घेवून जा गे मारबत
बाज काळा,साज पिवळा नेहमीचा राहु दे
रोगरोधी चिलखते लेवून जा गे मारबत
बांध तू तोंडास मुसके,साबणाने हात धू
स्वच्छतेचे भान हे देवून जा गे मारबत
२.
पेटत आले पायापाशी, बघा तेवढे
जळू लागले काय बुडाशी, बघा तेवढे
जुळून आले होते सगळे मनाप्रमाणे
कुठे शिंकली कळे न माशी,बघा तेवढे
परका वाटे देश आपला, शहर नासके
प्रवृत्तीच्या कोण मुळाशी,बघा तेवढे
खोल खोल आवाज चालला, श्वास कोंडला
आवळणारे पाश गळ्याशी, बघा तेवढे
पटीपटीने रोज बळावे, औषध नाही
कसे लढावे या रोगाशी, बघा तेवढे
लूट एवढी झाली तरिही बील मोजले
अडली बॉडी का दाराशी, बघा तेवढे
तोच आमचा की दुसऱ्याचा करा खातरी;
नंतर जाळा मृतदेहाशी, बघा तेवढे
३.
कुणाची परीक्षा? कशाची परीक्षा?
कशाला हवी रे विषाची परीक्षा?
पडे एकदा का कचाट्यात रोगी ;
पुढे वैद घेती खिशाची परीक्षा.
न खाई तरी खवखवे फार मित्रा !
करी तातडीने घशाची परीक्षा.
अरे एकलव्या, इथे काय करशी?
इथे अंगठ्याच्या ठशाची परीक्षा.
ब्युटीपार्लरे बंद आहेत बाई ;
नको एवढी आरशाची परीक्षा.
४
बाप पंढरीसी राहे,वाट लेकुरांची पाहे
औंदा वारीसी येतील,आस आषाढीसी राहे
माझा ज्ञानोबा आला का? कुठे माझे एका, तुका?
निळा, सोपान, मुक्ताई ; आले अद्यापही ना हे
कोठे विमानाची थोरी,साधी गाडी नाही दारी
चला आधी भाडे भरा, सल निवृत्तीसी दाहे
नामा चोखा पायरीसी,नाही दिठी कैक दिसी
लाहे लाहे आणा त्यांसी,भेटी जगजेठी लाहे
पुरवा देवाचिया आळी, संतजन मांदियाळी
स्वये अंगाखांद्यावर प्रेमभार हरी साहे
आज गत कैसी न्यारी, देवा दारी महामारी
भक्तजना धाक जरी, भिस्त पांडुरंगी आहे
पताकांचे दळभार,
नाही नामाचा गजर
सुने सुने वाळवंट, चंद्रभागा सुनी वाहे
No comments:
Post a Comment