तीन गझला : आत्तम गेंदे


१.

हारताही येत नाही जिंकताही येत नाही
खेळ प्रेमाचा मलाही अन् तुलाही येत नाही

का अशा अवघड ठिकाणी भेट अपुली होत असते ;
थांबताही येत नाही, बोलताही येत नाही

थेट नजरेतून काही देत असतो घोट साकी
मग मला प्याल्यात काही ओतताही येत नाही

कोणत्या धाग्यात नक्की गुंतलो आहोत आपण?
सोडताही येत नाही,ओढताही येत नाही

रंग ओठांचा तिच्याही उच्च जातीचा असावा
बोलताही येत नाही चुंबताही येत नाही

सूर्य आभाळात असताना नको येऊस चंद्रा
पाहताही येत नाही, टाळताही येत नाही

२.

तुझ्यावरही जगाची मालकी होती कधी काळी
तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी

तुला या संविधानाने दिला अधिकार चढण्याचा
तुझ्या पायात जुलमी साखळी होती कधी काळी

घरावर पिंपळाची सावली आहे पसरलेली
तुझी वस्ती उन्हाने जाळली होती कधी काळी

तुला साहेब होण्याचा मिळाला हक्कही आता
तुझ्या नशिबात केवळ चाकरी होती कधी काळी

स्वतःचा धर्म पाण्याला अताशा आठवत आहे
तहानेनेच बारव बाटली होती कधी काळी

३.

मुका, आंधळा झालो नाही
म्हणुन लाडका झालो नाही

दिशा दावली मी पाण्याला
फक्त ओंडका झालो नाही

फार चांगला नसेन मी पण
तुझ्यासारखा झालो नाही

न्याय दिला मी प्रत्येकाला
फक्त कायदा झालो नाही

चढणार्‍याला मदतच केली
कधी खेकडा झालो नाही

मी सूर्याचा वंशज आहे
म्हणुन काजवा झालो नाही

भक्तांची कमतरता नव्हती
मीच देवता झालो नाही

पायापाशी मासे होते
पण मी बगळा झालो नाही

माझ्या ठिणग्या मीच विझवल्या
कधीच वणवा झालो नाही

नवीन आहे पायवाट मी
अजून रस्ता झालो नाही

विनवत होत्या फुलदाण्या पण
मी गुलदस्ता झालो नाही

लोकलचा मी जनरल आहे
ए. सी. डब्बा झालो नाही

हसताना अभिनेता झालो
पण रडताना झालो नाही

स्वतंत्र आहे माझा साचा
क्लोन कुणाचा झालो नाही

....................................
आत्तम वामनराव गेंदे
परभणी
9921058414
9420814253..

No comments:

Post a Comment