१.
देठ कोवळा हळूच आजी खुडायची
फुलाबरोबर पानालाही जपायची
नात्यामधली जखम मला अन् मलम तुला
दोघांमध्ये अशी वाटणी असायची
प्राक्तन म्हणजे काय निराळे यापेक्षा
चांदोबाच्या तुपात माशी पडायची
बाबा शोधा,लपले आहे केव्हाची,
आभाळातुन लेक लाडकी म्हणायची
नजरेमधल्या प्रेमाची ही परिभाषा,
आजोबांना आजी राधा दिसायची
आठवणींच्या माळ्यावरही कधीतरी,
विस्मरणाची गूढ सावली पडायची
२.
वाढत गेली जशी शक्यता हरण्याची
फुलवत नेली मीही ठिणगी लढण्याची
पुसले केव्हा डाग वाळल्या अश्रूंचे?
कुणी शोधली जागा माझी लपण्याची?
नको नेहमी हात कुणाचा बुडताना
नको व्हायला सवय कुणाच्या असण्याची
समंध झाल्या भूतकाळच्या आठवणी
हिंमत नाही मागे वळून बघण्याची
तुटपुंज्या प्रतिभेला भीती कायमची,
वासरांमधे गाय लंगडी ठरण्याची
बोट उचलतो कोणावरही कोणीही
शिक्षा मिळते आयुष्यातुन उठण्याची
धाव काढली नाहीस तरी बेहत्तर,
गरज तुला या मैदानावर टिकण्याची
....................................
माधुरी चव्हाण जोशी
देवगड
No comments:
Post a Comment