दोन गझला : सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे



१.

पाऊस आसवांचा डोळ्यात दाटलेला
खोटा झरा असावा आतून आटलेला

शिकवू नका कुणीही, पाढा समानतेचा 
माणूस आज आहे, जातीत वाटलेला

पंखात त्राण चिमण्या आले कसे कळेना?
पल्ला कसा तिनेही ध्येयात गाठलेला

ऐकून रोज घेई, पारायणे नि गाथा
भेदात का तरीही माणूस बाटलेला?

दिनरात राबतो अन, जो पोसतो जगाला 
उघड्यावरीच शिवतो संसार फाटलेला

मी पापणीत जपल्या साऱ्याच भावना अन्
तू मौन भावनांचा बाजार थाटलेला

द्रोणा,अजून नाही देणार मी परीक्षा
मी एकलव्य नाही बोटास छाटलेला

२.

खूप फसवे झेलले सत्कार आता
वेदनाही फार झाल्या गार आता

वायदे आश्वासनांचे रोज भारी
थांबवा हे भामटे बाजार आता 

फार झाला योजनांचा भार माथी 
शासनाचे थोपवा उपकार आता 

पेटवा मन, चेतवा आशा मनाशी
अंतरी भिनवा नवा संचार आता

वाटली मुर्दाड का ही माणसे रे..?
राहिला ना तेज अन् अंगार आता 

जात पंथाला नको थारा कुठेही
मान द्यावा ना कुणी लाचार आता

शब्दशस्त्रे पाजळूनी मी निघाले 
हाच माझा लाघवी एल्गार आता
.......................
सौ. प्रीती राकेश वाडीभस्मे
वर्धा
..

2 comments:

  1. दोन्ही गजला अप्रतिम आहेत मॅडम
    मला खूप आवडल्या..👍👍

    ReplyDelete