दोन गझला : डॉ. स्नेहल कुळकर्णी



१.

अशी काही सुखाची कल्पना मांडा 
धुराचे थर धुके समजून ओलांडा

ठसे मातीतले पाहून ओळखले 
पुढे आहे निघालेला तुझा तांडा

कधी तापेल याची शाश्वती नाही 
करा शृंगार दुःखाशी अगर भांडा

कुठे त्याच्याविना ठरते खुनी पाते 
सुऱ्याचा वार करतो लाकडी दांडा   

तृषा वाढेल दर थेंबागणिक त्याची 
उन्हावर अमृताच्या घागरी सांडा  

जबानी लांबते किरकोळ वादाची 
तहाचा मनसुबा पडतो पुन्हा लांडा  

तळाशी पिंजरा उघडेल प्रथिनांचा 
गव्हाची आतडी सोला अगर कांडा  

२.

सतीसमवेत कर थोडा शिवा उद्धार माझाही 
सुगंधी श्वेत गजऱ्यांनी सजव शृंगार माझाही 

किती घेशील शोषुुन दव .. बदामी उष्ण ओठांनी 
धुक्याच्या भोवऱ्यामध्ये मिसळ अंधार माझाही 

'ति'च्या मजबूर हृदयाचे रितीने मूल्य करता तर 
टिळा लावून किमतीचा करा बाजार माझाही

तुझ्या नजरेत भरल्यावर.. लिखित वर्णाक्षरे माझी 
विठोबा शब्द एखादा जलावर तार माझाही 

मिळाला देव प्रियतम तर ..कशाला वाटणी त्याची 
तुझा आहे जसा बानू ..तसा मल्हार माझाही 

विनाकारण जिव्हा माझी तुझे गुणगान गाइल का ..? 
हवी आहे प्रशंसा तर ..अहं गोंजार माझाही 

नको माझ्याकडे पाहूस रखुमाई विषादाने 
विटेवर राहिला आहे उभा भरतार माझाही 

3 comments:

  1. अप्रतिम स्नेहलताई,तुमच्या गझल वाचणे हा आमचा अभ्यास आहे.

    ReplyDelete
  2. उत्तम गझल.
    तरल काव्यानुभुती देणारे आशयपूर्ण शेर

    ReplyDelete