१.
थाटात चांदण्यांची बघ पालखी निघाली
तितक्यात एक तारा पडला गळून खाली
लाडात वाढलेली घेते निरोप जेव्हा
दाबून हुंदक्यांना "निघते " मला म्हणाली
भिंती रित्या घराच्या शोधून शांत झाल्या
गेली कुठे घराची म्हणती मला खुशाली...
चिवचिव करीत आली सजला घरात खोपा
लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली...
अंधार मावळेना सोडून सूर्य गेला
आता कुठे कुठे मी शोधू कशा मशाली...
डोळे पुसून माझे विसरू नका म्हणाली
मुलगीच दीप होती तेव्हा मला कळाली...
पाहून बाहुलीला आले भरून डोळे
पुसणार कोण आता माझी इथे खुशाली..
२.
दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे
आयुष्याची किंमत माझ्या ठरणे बाकी आहे
पुढील जन्मी हिमालयाचा झरा बनव ना देवा
या जन्मींच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे
मंदिर मस्जिद चर्च मधेही एक आरसा ठेवू
माणसातला देव अजुनही दिसणे बाकी आहे
डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली
काळोखातुन चांदोबाचे निघणे बाकी आहे
कोण ओतते तेल कळेना दिव्यास मिळते ऊर्जा
अंधाराच्या कैक तपाचे मिटणे बाकी आहे
डोळ्यामागे हृदय धावते हृदयामागे आपण
बिनडोळ्यांच्या हृदयाला हे दिसणे बाकी आहे
असून नसल्या सारखे इथे जीवन जगलो आता
नसल्यावरती माझे येथे असणे बाकी आहे
विश्व पाहिल्यावरती शेवट आरश्यात मी बघतो
रज:कणाचा एक अंश मज कळणे बाकी आहे
क्षणात बदलुन जातिल चित्रे पडद्यावरची येथे
आयुष्याला इथे तरीही कळणे बाकी आहे
चंद्र तारका सोडुन पृथ्वी बघणे बाकी आहे
क्षणाक्षणाला मेल्यानंतर जगणे बाकी आहे
३.
अरे या लोकशाहीला खिशातच ठेवता येते
नियम ठेवून धाब्यावर कसेही वागता येते
दिशा पाहून वाऱ्याची तुला जर चालता येते
प्रवाहाच्या विरोधातच मलाही वाहता येते
खरे आहे तुला खोटे सहज जर बोलता येते
तुझ्या डोळ्यात लपलेले मलाही वाचता येते
हवेवर स्वार होतांना दिशा कळते न मेघांची
जमीनीवर असुन सुध्दा ढगांशी बोलता येते
कधी लिहिलास का तू ही गझलचा शेर एखादा
मुक्याने शल्य जगण्याचे जगाला सांगता येते
वचन द्यावे कुणाला का? कुणाची आण का घ्यावी ?
इथे तर कायद्यालाही सहज जर तोडता येते
कुठुनही तोड पारंबी वडाचे झाड आहे मी
हवे तेथे हवे तेव्हा मलाही उगवता येते
........................
डॉ.राज रणधीर
९९२२६१४४७१
जालना
अप्रतिम उपक्रम,मला आपल्या संग्रहात समाविष्ट करूनघेतल्याबद्दल मी आपला ऋणी आहे .. स
ReplyDeleteअप्रतिम गझला सर 🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम गझला राज सर
ReplyDelete