१.
वेगळीशी वागली का ती जराशी
बातमी ताजीच येते मग घराशी
झाकलेल्या पापण्यांना ही कळेना
जागते बघ रात्र वेडी का उशाशी
श्वास काही मोकळाही होत नाही
भांडताही येत नाही मग जगाशी
संपलेले वाटते सारे अताशा
बांधली ना गाठ मग मी त्या मनाशी
तोडल्याने का तुटावी बंधने ही
घट्ट नाते ही असावे पण मुळाशी
कोणते नाते असावे ह्या तिघांचे
चांदव्याचे, तारकांचे अंबराशी
वेदनेला अंत नाही माणसाच्या
कोण जाणे तो किती आहे उपाशी
२.
अता आसवांनी गळावे कशाला
उगा पापण्यांना छळावे कशाला
हवे ते मिळाले जरी पाखरांना
सुगंधी फुलांवर जळावे कशाला
असा गोड आहे अबोला तुझा की
दुराव्यात मग हळहळावे कशाला
किती गुंतलो एकमेकात आपण
लळा लावल्यावर पळावे कशाला
मला हाय माझ्या मनाचे कळेना
तुला तेच सारे कळावे कशाला
करू काय आता जुन्या आठवांचे
पुन्हा पाय मागे वळावे कशाला
No comments:
Post a Comment