तीन गझला : रोशनकुमार पिलेवान

१.

मी भुकेचा गळा घोटला कैकदा 
आतड्यांचा पिळा सोसला कैकदा 

टाळण्याला सदा कोरड्या पापण्या 
मी ऋतू  सावळा पोसला कैकदा

भेटली श्वापदे हिंस्त्र चोहीकडे
माणसांचा मळा शोधला कैकदा

टांगण्या दुःख भिंतीवरी बोचरे 
मी सुखाचा खिळा ठोकला कैकदा 

मोक्ष  देण्या मढ्याला पुन्हा एकदा 
पिंडिला कावळा पोसला कैकदा 

दोस्त ही आंधळा गोवला कैकदा 
कायदा आंधळा तोडला कैकदा


बोलवाना मुलांना गुरूजी अता 
शिक्षकांना फळा बोलला कैकदा

२.

खंगली इतकी कशाने सांग म्हातारे 
दुःख , वेणा वळचणीला टांग म्हातारे 

आसवे डोळ्यात येता पाहुणा बोले
फेडले का लेकरांनी पांग म्हातारे  

माय मोदींची हवी या बातम्यांनाही
ही जरी नोटा बदलते रांग म्हातारे 

बोलते का एकटी  ? हल्ली कुणाशी तू? 
आजही ना लागला हा  थांग म्हातारे 

आस वेडी गावची ना सोडता आली 
पाहिला स्वप्नात का हाँकाँग म्हातारे

हा जरी देहास  लकवा मारला आहे 
जाहले नाते परी  विकलांग म्हातारे

३.

माणुसकीने  माणुस सुद्धा  वागत नाही हल्ली 
मरणाराला कोणी पाणी पाजत नाही हल्ली 

दिवसा ढवळ्या मिठ्या मारती तरूण गल्लोगल्ली 
निर्लज्जांनी कळस गाठला लाजत नाही हल्ली 

पुस्तकातले किडे कुणी तर गुलाम मोबाइलचे 
माणसास हा  माणुस साधा वाचत नाही हल्ली 

काम करोनी हसून  बोलला, "नको मजुरी
मालक!"
बंपर काढा या पव्व्याने भागत नाही हल्ली 

भुंकत आले , गेले , पुन्हा उद्या जरी येणार तरी 
मी हत्ती श्वानांच्या नादी  लागत नाही हल्ली 

बघ सेवेच्या नावाखाली स्वार्थच दडला असतो 
उदक  चाखल्या विना तळेही राखत नाही हल्ली 

गृहमंत्र्याचे सूत्र खुबीने हाती आल्यावरती 
नाचवते नव-यास ,  बायको नाचत नाही हल्ली 
..................................
रोशनकुमार शामजी पिलेवान 
चंद्रपूर
7798509816

No comments:

Post a Comment