१.
उगा गोंजरावे सुखाला कशाला
मुक्या वेदनेला पिटाळा कशाला
उद्याच्या रवीच्या ललाटी झळाळी
अशी लाच द्यावी मनाला कशाला
विषारी मनाचे किती लाड केले
फुका दोष द्यावा जगाला कशाला
भले चार आठ्या तुझ्या या कपाळी
सुखाचा तरी हा दिखावा कशाला
पुरे बास झाले अता लाळ घोटुन
पुन्हा काटकोनी कणा हा कशाला
किती थोर आहे नशा जीवनाची
दडवलास बंटा उशाला कशाला
२.
सर्व माझे कारनामे पाहिल्याने एकदा
बिंब मग ते टाळले त्या आरशाने एकदा
यातनेने हात माझा कौतुकाने पकडला
फरफटत नेले मला तेव्हा सुखाने एकदा
थाटला संसार होता छान त्यांनी ज्या घरी
त्या घराचे हाल झाले तारणाने एकदा
माणसाळवले जनावर माणसाने कैकदा
श्वापदागत कृत्य केले माणसाने एकदा
बैसला मौनात तो घनघोर तंद्री लावुनी
काळ इतका सोसला त्या गौतमाने एकदा
No comments:
Post a Comment