तीन गझला : योगिता पाटील


१.

पुन्हा मी टाळल्या कविता, पुन्हा मी वाचले डोळे
हरवली डायरी नंतर तरी सांभाळले डोळे

मला ठाऊक होते की दरी ही अंत नसलेली
जरा पाऊल आवरले खुबीने टाळले डोळे

कधी गर्दीतही आली तुझी आमंत्रणे जर का
तसे मग बेधडक मी ही तुझे कवटाळले डोळे

तुझ्या हाका तुझे गाणे तुझे हसणे तुझी बडबड 
तरी कळलेच ना नक्की कशावर भाळले डोळे

जरा ओतून दे ना तू असा डोळ्यात डोळ्यांना
नशा तर पाहिजे आहे...कशाला झाकले डोळे!

तुला कळणारही नाही असे मी रोखले अश्रू
किती मोठ्यांपरी तेंव्हा तिथे मग वागले डोळे

कुणाचा डाव होता हा? कुणी रचली अशी मोहिम?
कुण्या मग्रूर हातांनी तुझे हे आखले डोळे!
 
कुणाला वाटली दारू कुणाला भासली दुःखे
कसे सांगू किती रात्री कसे हे झोपले डोळे

किती गेले ऋतू वाया मनाला गारवा नाही
जरा पाऊस हो ना तू कधीचे साचले डोळे

२.

प्रेमामध्ये पडतो आपण
स्वतः स्वतःला छळतो आपण

रितेपणाची दारू होते
तिचेच पेले भरतो आपण

डोंगरमाथा खुणवत असतो
त्यानंतर कोसळतो आपण

हव्यास असतो दुःखाचाही 
दुःखाने लाडवतो आपण

ओळख पटते या दुनियेची
कुठे स्वतःला कळतो आपण

हयात जाते तहानलेली 
क्षण एखादा जगतो आपण

आयुष्याची टाळी येते
अलगद त्याला फसतो आपण

रात्र कोरडी ठणकत जाते
मग मैफल गाजवतो आपण

३.

तसे नव्हतेच ना जगणे तुझ्या आधी तुझ्या नंतर
कुठे अन मी अशी होते! तुझ्या आधी तुझ्या नंतर

अता प्रत्येक क्षण येतो ऋतूंचा सोहळा होउन
उन्हाचे चांदणे नव्हते तुझ्या आधी तुझ्या नंतर

किती लांबून बघ येतो स्मृतींचा मुग्ध हा चाफा
घडे नुसतेच दरवळणे तुझ्या आधी तुझ्या नंतर

मला इतकेच स्मरते की निसरडी वाट होती ती
कधी मी घेतली वळणे तुझ्या आधी तुझ्या नंतर!

तुझ्या नुसत्याच येण्याने उजागर व्हायची गल्ली
मनाचे व्हायचे गाणे तुझ्या आधी तुझ्या नंतर

अताशा प्रहर कळतो प्रहर खुलतो रोज बेताने
घड्याळाचे जणू काटे तुझ्या आधी तुझ्या नंतर

तुझे असणे जसे पाऊस रिमझिम अन तुझे हसणे
पुन्हा आहेच मग झुरणे तुझ्या आधी तुझ्या नंतर

No comments:

Post a Comment