दोन गझला : सुधाकर झिंगाडे



१.

सकाळी सकाळी फुले वेचताना
कळे प्रीत गालात तू हासताना

तुझे रूप सौंदर्य ओढे मनाला
नभाची परी तू दिसे लाजताना

सुगंधी कळ्यांच्या सवे तू फुलावे
फुलावे तुझे गीत मी  ऐकताना

सखे तू त्रिकाली सवे नांद माझ्या
तुझा हात हातात गं चालताना

तुझ्या अंगअंगात सौंदर्य खेळे
सुखानंद वाटे तुला पाहताना

हळू सांगती भाव प्रीती इशारे
लपंडाव नेत्रातला खेळताना

सखे गं करू साथ वेळी अवेळी
प्रिये जीवनी प्रीत साकारताना

२.

मनी भावभक्ती तुझी रे विठ्ठला
तुझ्या दर्शनाची कसोटी पणाला

उरी धाव आषाढ एकादशीची
कशी रांग लावू तुझ्या दर्शनाला

तुझ्या पादुका पालखी वाहतोही
मनी भावसेवा रुजावी त्रिकाला

सवे संत पंक्तीत पीयूष गोडी
प्रभू वास वारीत लाभे मनाला

जगाचा पसारा तुझा खेळ मोठा
धडा मातलेल्या विनाशी जगाला

असे तू विधाता कृपावंत दाता
तुझे नाम घेताच भीती लयाला

सहाय्यास धावा करे कोण दुःखी
तुझी साथ वेळीच दे रे तयाला

...................................
सुधाकर झिंगाडे
9834882341

No comments:

Post a Comment