Showing posts with label गौतम राऊत. Show all posts
Showing posts with label गौतम राऊत. Show all posts

तीन गझला : गौतम राऊत


१.

फक्त दोघातला माहितीचा विषय
आज झाला कसा बातमीचा विषय

हे खरे सावलीने लळा लावला
पण उन्हाळा मला आवडीचा विषय

आज शाळेत आलो उपाशीच मी.
सर नका काढु ना भाकरीचा विषय

कोण जाहीर केले सभा संपली?
बोलला ना कुणी बाभळीचा विषय

का पचवतो कुणी दाभणाएवढे?
भांडणाला कुठे टाचणीचा विषय

काय माहीत पण धस्स होते उरी
दूर झाला जरी काळजीचा विषय

माय माझ्याकडे बाप माझ्याकडे..
जर निघालाच तर वाटणीचा विषय

२.

विषय जर हातघाईचा
स्मरावा पाठ आईचा

जिथे आभाळ स्वप्नांचे
तिथे का प्रश्न खाईचा

जरी काटयात असते ती
फुलाचा जन्म बाईचा

करा कौतुक गुलाबाचे
नको पण द्वेष जाईचा

नको ना सारखा फुगवू
फुगा फुटतो बढाईचा

कुणाला वेळ असतो तर
मला रविवार घाईचा

३.

चालणे अडखळू दिले नाही
पाय खोटे कळू दिले नाही

घात केला मधेच झोपेने
स्वप्नही हिरवळू दिले नाही

प्रश्न होते कठीण काही पण
मी मला गोंधळू दिले नाही

काय नक्की मनात वाऱ्याच्या
पानही सळसळू दिले नाही

पैज तर मीच जिंकली असती
फार दुरवर पळू दिले नाही
........................
गौतम राऊत ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर                   ८५५१८८६००९