१.
अन्यायाशी झगडत गेलो विचार केला नाही,
आयुष्याचे पत्ते पिसले जुगार केला नाही
सुख दुःखाचे खडतर जीवन लढता लढता जगलो,
स्वार्थ साधण्या कुठेच खोटा प्रचार केला नाही
सत्य अहिंसा शांती नीती मनात भरली आहे,
घाव सोसले शत्रूचे पण प्रहार केला नाही
दोस्त भेटले भले बुरेही अनेक जागोजागी,
व्यसनांचा मी कधीच कोठे स्विकार केला नाही
प्रत्येकाचा धर्म वेगळा जात वेगळी येथे,
देव मानला माझ्यापुरता प्रसार केला नाही
निर्मळ जीवन झऱ्यासारखे देतच गेले मजला,
आनंदाने घेतच गेलो नकार केला नाही
२.
निरखून नीट घ्यावा हा चेहरा जगाचा
स्वार्थी समाज येथे नाही कुणी कुणाचा
शेरातुनी दिसावा आशय सटीकतेने
ठेवू नकोस नुसता खोगीर काफियाचा
शेतातल्या अपेक्षा करपून रोज मरती
नाही उपाय यावर सरकार, विठ्ठलाचा
चिंता नको टिकेची झोकून दे स्वतःला
रस्त्यासही विरोधी गतिरोध अडथळ्याचा
नाते तुझे नि माझे विश्वास प्रेम देवा
आता अजून का मग आधार देवळाचा?
सुंदर तुम्ही लिहा हो वृत्तात रोज कविता
वृत्ती परी जपावी अन बाज आशयाचा
........................
विजो (विजय जोशी)
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
अप्रतिम....दोघही गझला...अभिनंदन सर
ReplyDelete