१.
ऐकून घे जरासा, एकच सवाल आहे
हेका उगा कशाला, 'माझीच लाल आहे'
बोलायचे तरी पण, बोलू कुणास आता
माझाच हात आहे, माझाच गाल आहे
समजून घे जरासा प्राॅब्लेम हा मुळातुन
तो सूर वेगळा, हा भलताच ताल आहे
मध्यस्थ तो कशाला, भांडण तुझे नि माझे
केवळ तुझा नि माझा हा सर्व माल आहे
चालू वरून कीर्तन, आतून हा तमाशा
कुठल्या दिशेस नक्की ही वाटचाल आहे
चढवून हरभ-याच्या झाडावरी बसविले
लपटून मारलेले जोडे नि शाल आहे
२.
आवर थोडी तीक्ष्ण तुझ्या नजरेची ती टोके
कुठवर लपवू आता माझ्या बनियनची भोके
नका विचारू मजला तारिख, वार, साल, महिना
आहे कोठे ठिकाणावरी सध्या हे डोके
भीती मजला धटिंगणासम नव-याची तुझिया
तुलाच नाही अडचण कसली, तर मीही ओके
कशास ऑक्सीमिटर, कशाला तापाची भीती
त्याच त्याच बातम्या पाहुनी मोजुन घ्या ठोके
उत्साहाच्या भरात केली नसती चूक अशी
जर सांगितले असते कोणी लग्नाचे धोके
मटकावित बसलेला मर्कट लोण्याचे गोळे
न्यायासाठी आ-वासुन बसले सारे बोके
जगण्या-मरण्याची अपुली चिंता करते सरकार
वेफर चघळत झोपाळ्यावर, या घेऊ झोके
३.
आवरा ना मित्रगणहो ! फालतू नखरा किती
संपला अर्धाच खंबा आणि हा बभ्रा किती
खूप दिवसांनी मिळाली आयती संधी अशी
सापडत नव्हताच हाती, खट्ट हा बकरा किती
दीडदमडीची फुकटची प्यायला मिळता जरा
आणले चकणा नी वेफर लोटला कचरा किती
चोंबड्या शेजारच्यांपासुन रहा सावध जरा
कान ते टवकारलेले, चोरट्या नजरा किती
लार्ज झाला पेग बहुदा, तू दमाने ओत ना
फक्त दुसरा घेतला अन् लागला खतरा किती
टाक तू पाऊल जपुनी आत शिरताना घरी
बायकोला भास व्हावा शांत हा नवरा किती
काय जादू त्यात आहे दोस्तहो सांगा जरा
नाव त्याचे काढल्यावर चेहरा हसरा किती
४.
पोस्टवू आता कशी मी,नेट झाले स्लो किती
जीव झाला घाबरा अन् घालतो हा खो किती
का बरे बोलू तिला अडलेय का खेटर इथे
मी बिचारी शांत बसले, पण तिला ईगो किती
रोज ही गर्दी कुठे जाते खपाया ना कळे
थांबले रांगेत तरिही लांबला हा रो किती
तीळसुद्धा भिजत नाही या जिभेवरती तिच्या
खुट्ट वाजू द्या कुठेही करत असते ठो किती
एकतर घाईत होते केस सुटले मोकळे
आणि तू म्हणतेस मजला सैल झाला बो किती
सारखे किंचाळुनी मी सांगते आहे नको
आणखी जोरात सांगू मी जगाला नो किती
ती कमवते खूप आता पोसते घरदारही
भेद आता का करावा, ती किती अन् तो किती
५.
तोंड फडक्याने किती लपवायचे
सांग कुठवर फालतू भटकायचे
फोन, गूगल पे, हवेतर कॅश दे
चेक कोरे मी कुठे वटवायचे
ठेवले तैयार सारे मी गडी
तू तुझे बघ, त्यातले कटवायचे
एकदा तू चांगले ठरवून घे
जन्मभर हे लोढणे लटकायचे
सापडत नाहीत नोटा कालच्या
हे खिसे आता किती झटकायचे
बातमी सांगू नको आता तरी
ऐकुनी आताच ते गचकायचे
ओळखीचे लोक सारे भोवती
साधुनी संधी जरा, सटकायचे
बघ, किती झालाय लोचा नेमका
वागणे त्याचे मला खटकायचे
नीट टाका पाय ते आतातरी
चालताना नेमके लचकायचे
चांगली अद्दल घडवली ठोकुनी
यापुढे नाहीच ते फटकायचे
पाहुनी घे एकदा मागेपुढे
नेमके कोणीतरी हटकायचे
६.
वाटतो का एवढा मी फालतू
ब्लाॅक केले का मला मग काल तू
सूड घेते कोणत्या जन्मातला
का बरे करतेस माझे हाल तू
सर्वकाही मी दिले आणुन तुला
व्यर्थ का फुगवून बसते गाल तू
मी पटावर चाललो होतो सरळ
वाकडी केलीस का ती चाल तू
माहिती नाही कसा फसलो इथे
फेकले की काय मायाजाल तू
मी समेवर येत नाही नीटसा
चुकविते मुद्दाम का हा ताल तू
मी तसा हळवाच पूर्वीपासुनी
आसवांची का करावी ढाल तू
एकही रुपया नसे खर्चायला
काढुनी दे ढापलेला माल तू
.......................
कालिदास चावडेकर
सर्व गझल,हझल रचना खूप सुंदर....अभिनंदन सर
ReplyDeleteसुंदरच सर जी !
ReplyDelete