१.
आठवणींची स्वप्ने सारी खोडत जागत आलो
सत्यासाठी माझ्याशी मी नित्यच भांडत आलो
आयुष्याला शिवताना हातातूनी वय गेले
नात्यांना टिकवित मी बेरिज मोडत जोडत आलो
लाखो हरले आयुष्याला ह्या कोरोनापायी
पाळत नियमांना मी कोविडला पण हरवत आलो
पुढती जाणा-यांच्या चुकलेले सोबत नसती ते
त्यांच्या साठी मुद्दे सारे सांगत मांडत आलो
जथ्थे अत्याचारी निघती माराया सत्याला
दुष्टांच्या त्या वस्तीला धम्माला शिकवत आलो
डोळस असता धक्के देती जे नाहक अंधाला
त्यांच्या कोत्या बुद्धीला मी ओढत कोंडत आलो
२.
राव असो की दास असू दे
माणुसकीचा वास असू दे
मी मी बोलुन,वीर संपले
जगण्याचीही आस असू दे
रस्त्यावरच्या जखमीला पण
वाचविण्याचा ध्यास असू दे
दारावरच्या पाटी वरती
नाव सखीचे खास असू दे
आयुष्याच्या संध्याकाळी
कधी तरी मधुमास असू दे
दुसऱ्याच्याही नावाचा पण
ताटामध्ये घास असू दे
म्हाताऱ्या आई बापाचा
असला तर मग त्रास असू दे
सिद्धार्थाने महल त्यागला
त्या त्यागाचा भास असू दे
३.
सुग्रास जेवतो मी भीमा तुझ्यामुळे
लाखात खेळतो मी भीमा तुझ्यामुळे
नेसावयास होती बापास लक्तरे
बघ सूट नेसतो मी भीमा तुझ्यामुळे
राहावयास होती तुटकीच झोपडी
माडीत राहतो मी भीमा तुझ्यामुळे
मा बाप काम करण्या होते उन्हात ते
एसीत झोपतो मी भीमा तुझ्यामुळे
झुकवून मान चाले त्यांच्या समोर बा
ऐटीत चालतो मी भीमा तुझ्यामुळे
पायास फोड होते बापास चालता
मोटार फिरवतो मी भीमा तुझ्यामुळे
तू संविधान दिधले देशास आपुल्या
हक्कास जाणतो मी भीमा तुझ्या मुळे
........................
रमेश निनाजी सरकाटे
भुसावळ
संपर्क: 9967330465 8356859422
छान
ReplyDelete