तीन गझला : महेन महाजन


१.

ही कसली भीती आहे? ही कुठली दहशत आहे?
मरणाच्या दारामध्ये जगण्याची कसरत आहे!

तू समूळ मजबुत फांद्या, सांभाळ झाड होऊनी..
काळाच्या हातामध्ये ही कुजकी करवत आहे

हा काळ जरी सध्याचा विक्राळ वाटतो आहे
या काळोखाच्या पुढची ही सकाळ हसवत आहे

या विश्व पसाऱ्यामधल्या तू धुळीकणाच्या इतका
मग कसला माज फुकाचा तू उगाच मिरवत आहे

हे हात जोडुनी दोन्ही मी विनम्र त्याच्या ठायी
गांजल्या जिवाला सगळ्या जो माणुस समजत आहे

२.

किती ही वाकली फांदी फळांचा भार झाल्यावर
तरीही सोडले नाही फुलांना ऊन वाऱ्यावर

स्वतः ज्याने खुशीने जर निनावी वादळे धरली
कसे राहिल मला सांगा तयाचे चित्त थाऱ्यावर

नको सांगूस लाटांना कहाणी प्रेमभंगाची
नव्याने रोज मरती त्या समुद्राच्या किनाऱ्यावर

किती जखमा नि दुःखाला खुबीने दळत ती आली
तरीही भिजविले नाही कधी ओवीस जात्यावर

भुकेचा प्रश्न जो होता निकाली काढला तो ही
अता आयुष्य हे माझे शिजवतो मी निखाऱ्यावर

३.

जगण्यास मान अमुच्या तुमच्यामुळेच बाबा
देहात प्राण अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

हे संविधान आहे बाबा तुम्ही दिलेले
हक्कास भान अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

चवदार त्या तळ्याचे पाणी बहाल केले
पदरात दान अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

घेऊन लेखणीला लढण्यास आज शिकलो
भात्यात बाण अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

अन्याय सोसला ना सोसू दिला कुणाला
न्यायास मान अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

वाट्यास आज आले कर्तृत्व, योग्यतेने
हिरवेच रान अमुच्या तुमच्यामुळेच बाबा

शिक्षण, समानता ज्या गीतात गायिले ते
कंठात गाण अमुच्या तुमच्यामुळेच बाबा !
........................
महेन महाजन
आंजी (मोठी) वर्धा
9730962901

2 comments: