१.
झोकून दे गड्यारे, कामात तू स्वतःला,
घे भिजवुनी सदारे, घामात तू स्वतःला.
मतदान हक्क आहे, सोडू नको उगा तो,
विकतो कश्यास वेड्या, दामात तू स्वतःला.
सीता नकोच शोधू, तू आसपास कोठे,
शोधून बघ मिळेका, रामात तू स्वतःला.
हो बासरी कधी तू, त्या कृष्ण सावळ्याची,
घे मिटवुनी घडीभर, श्यामात तू स्वतःला.
समजू नको स्वतःला, तू खास फार आहे,
दाखव सदा जगाला, आमात तू स्वतःला.
कोलाहलात कां रे, बाहेर तू भटकतो,
कोंडून घे जरासा, धामात तू स्वतःला.
संसार फोल आहे, सांगून संत गेले.
घे गुंतवून वेड्या, नामात तू स्वतःला.
२.
तुडवून गेला भावना,
दुखरी असे ती वेदना.
कां रे असा तू वागला,
येवून मजला सांग ना.
झाले अता वैराण मन,
उरली न काही कामना
श्वासात होता तू सदा,
आहे कुठे तू दाव ना.
देहात माझ्या बघ सख्या,
उरली जरा ना चेतना.
कंठास आले प्राण हे,
प्राणेश्वरा तू थांब ना.
भजतेय राधा बावरी,
कृष्णा मला तू पावना.
३.
सत्य एक जाण मित्रा,
मित्र म्हणजे प्राण मित्रा.
सोबतीने राहताना,
लागतो ना वाण मित्रा.
ताणता तुटतेच नाते,
बघ हळू तू ताण मित्रा
काळजी घे बोलतांना,
शब्द होतो बाण मित्रा.
मी असा आहे सुदामा,
तू गुणांची खाण मित्रा.
पाहता दुःखी तुला रे,
गमवितो मी त्राण मित्रा.
फूल व्हावे मैत्र अपुले,
मग मिळो निर्वाण मित्रा.
.............................
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)
No comments:
Post a Comment