तीन गझला : आत्माराम जाधव




१.

मी कुठे इतके मनावर घेत आहे
फूल,काटे ;जे दिले ते नेत आहे

वाटणाऱ्यानेच शिरणी लाटली अन्
भाबडी जनता उभी रांगेत आहे

दुःख कसले! पाळलेले एक पिल्लू
सारखे माझ्याच मागे येत आहे

जीवनाचा स्तर किती उंचावलेला
मानसिकता केवढी गर्तेत आहे

चिलखताच्या भरवशावर प्रेम करतो
जाणतो चाकू तुझ्या बगलेत आहे

ही गझल माझी कुठे तुमचीच दुःखे
फक्त झालर लावुनी मी देत आहे

वाचते डोळ्यात माझे दुःख आई
कोणती विद्या तिच्या नजरेत आहे

तू जरी आजन्म अंधारात 'जखमे'
बघ तुझी कविता किती चर्चेत आहे

२.

केवढी  चर्चेमधे ही  वात  असते
संपणारे   तेल  अंधारात  असते

पेरताना शोधतो कोणास कुणबी 
हात चाड्यावर नजर गगनात असते

उंच शिखरावर उद्या जाशीलही पण
आजची जागा खरी औकात असते

भरडते वेळी किड्यांना माफ करतिल
एवढी दानत कुठे जात्यात असते

जीव देणाऱ्या तुला माहीत नाही
केवढी गंमत इथे जगण्यात असते

कावळ्या हरखू नको,ती साद नाही
कोकिळा धुंदीत अपुल्या गात असते

बैल होउन राबते शिस्तीत दुनिया
कोणती वेसण तिच्या नाकात असते?

मरण जेंव्हा वेढते दाही दिशांनी
त्या लढ्याची नोंद इतिहासात असते
                       
३.

बाहूत कोण आहे? घरट्यात कोण आहे?
सांगू कसे  कुणाला हृदयात  कोण आहे?

हा खणखणाट कैसा गावात सज्जनांच्या
म्यानेत  मी कधीचा  हातात कोण आहे?

गजऱ्या तुझ्या फुलांचा उतरेल कैफ आता
ते बघ तिथे उगवले चिखलात कोण आहे?

दैवा  पुढे  कलेचा  पाडाव  हा  पहा ना
मेण्यात कोण आहे ताफ्यात कोण आहे?

मोकाट पाखरांना लावू नको लळा तू
ते सोबती सुगीचे ग्रीष्मात कोण आहे?

डोक्यात फार शंका डोळ्यात राग दिसतो
पाहून  घ्या  तयांच्या  कानात  कोण आहे?

रावण खुशाल जाळा पण ऐव्हढेच सांगा
रामा समान सज्जन तुमच्यात कोण आहे?

मैल्यावरून  सगळे  नाल्यास  दोष  देती
नाल्यास साफ करण्या शहरात कोण आहे?  
 
.......................
 
आत्माराम जाधव 
















                     
            

No comments:

Post a Comment