१.
मनाप्रमाणे जगणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
जगासही अनुसरणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
क्षणभर जिवंत रेघोट्या पाहून दिलासा होतो पण
वाळूवरती लिहणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
कुणी जरी माझ्यावरही अदृष्यपणे हसले तरिही
मी त्याच्यावर हसणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
अज्ञानाचे पंख लावुनी किती दूर उडणार कुणी
निरर्थकाचे उडणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
निर्जिव भिंतीसोबत बोलुन अखेर इतके कळले की
एकाकी बडबडणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
वाळवंट झालेल्या मनात कुठले झाड उगवते का ?
त्याचे पोषण करणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
जरी निखा-यावर चालेन तुझ्यासाठी म्हटले तरिही
तसे खरोखर करणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
हे वेडेपण जपणा-यांवर कुठलेही औषध नाही
प्रेमामध्ये पडणे म्हणजे निव्वळ वेडेपण आहे
२.
वेगळा आहे तरीही चालतो रस्ता तुझा
पावलावरती जणू मी मारला शिक्का तुझा
सांगतो आहेस का टाकायला पत्ते मला
जर तुझ्या खेळातली राणी तुझी एक्का तुझा
मी अडाण्यासारखा चालूनही चालू किती
शोधताही येत नाही जीवना पत्ता तुझा
एकतर हे एकटेपण खायला उठते सतत
आणि वर स्विच ऑफ असतो फोनही दोस्ता तुझा
प्रेम अन वात्सल्य शब्दातून भेटू लागते
वासरू होऊन जेव्हा वाचतो मिसरा तुझा
घर मुलीने घेतले, शेती मुलाने घेतली
शेवटी बटव्यात फ़ोटो राहिला बुद्धा तुझा
कोण ओळखतो तुला एजाज साहित्यामधे
फार वेड्यासारखा लिहतोस तू मक्ता तुझा
३.
कुणाचा चेहरा लावून जगता येत नाही
बरे की हे मला अजिबात करता येत नाही
असे समजू नका दारूच डोळे लाल करते
असे समजू नका बापास रडता येत नाही
मनाच्या आतला अंधार जाळा की अगोदर
दिवे लावून दैवाला मिरवता येत नाही
मला बाहेर काढा चाललेल्या नाटकातुन
मला ठरवून सुद्धा सोंग करता येत नाही
तुझी मी वीट आहे तू उभा आहेस ज्यावर
तुला माझीच इच्छा पूर्ण करता येत नाही
स्वतःशी राबता एजाज असला पाहिजे ना ?
जगाशी राबता ठेवून लिहता येत नाही
वाह भाई ! बढिया !!
ReplyDelete