अफ़साना लिख रही हूं : डॉ.संगीता म्हसकर


इंग्रजांच्या काळात गझलचा फारसा विकास जरी झालेला नव्हता हे जरी खरं असलं तरीही तिची वाटचाल त्या दिशेने सुरू होती हे नाट्यसंगीताच्या इतिहासातून जाणवते.खरं तर नाट्यसंगीताचा काळ हा गझलच्या भविष्यातल्या सुवर्ण युगाची नांदीच होती असं आपल्याला म्हणता येईल.
याचं कारण म्हणजे काळाच्या ओघात मराठी आणि उर्दू रंगभूमीवरचा संगीत नाटकांचा काळ जरी मागे पडला तरी त्या काळातूनच चित्रपट संगीताचं अद्वितीय असं दालन निर्माण झालं.जणू ललित कलांच्या सह -अस्तित्वाची प्रचिती आल्यामुळे, सिनेमा मधे गाणी हवीच हा जसा काही भारतीयांचा अलिखित नियमच बनला. गाण्यांशिवाय चित्रपट भारतात सहसा बनत नाहीत.साहजिकच इतर गाण्यांसोबत गझलचाही चित्रपटात प्रवेश झाला.चित्रपटात आलेली ही गझल मात्र पारंपरिक गझलच्या तुलनेत बरीच वेगळी होती.तिचं स्वरुप हलकं फुलकं, चित्रपट गीताला साजेसं असंच होतं.मात्र महत्वाची बाब म्हणजे या काळात गझलला उत्तम शायर, उत्तम संगीतकार आणि गायक लाभले.त्यामुळे गझल ख-या अर्थाने सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर रुळली.
चित्रपटातली गझल लोकप्रिय करण्याचं श्रेय बेगम अख्तर आणि तलत मेहमूद या कलावंतांचं !
'रोटी' या चित्रपटात गायिका आणि नायिका अशा दोन्ही भूमिका बेगम अख्तर यांनी केल्या होत्या.
चित्रपट सृष्टीसाठी गझलची सुरुवात मात्र नसीम बानो यांनी गायलेल्या गझलने झाली होती.
'पुकार' या सिनेमासाठी,

'ज़िन्दगी का साज़ भी क्या साज़ हैं..
बज रहा है और बे आवाज़ हैं... '

कमाल अमरोही यांच्या लेखणीतून उतरलेली ही गझल, 'मीरसाहेब' यांनी संगीतबद्ध केली होती.
तलत मेहमूद यांनी सुद्धा सुरुवातीला गायक आणि नायक अशा दोन्ही भूमिका केल्या.गझलला खरा न्याय त्यांनी दिला.

'मुहब्बत ही ना जो समझे,
वो ज़ालिम प्यार क्या जाने,
निकलती दिल के तारोंसे
जो है झंकार क्या जाने '

'परछाई' चित्रपटातली नूर लखनवी यांची ही गझल सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केली होती.ही गझल तलत मेहमूद यांच्या कातर स्वरातून मनाची सैरभैर अवस्था नेमकी व्यक्त करुन गेली.आणि हा दर्द हीच तलतच्या आवाजाची खासियत ठरली.
तलत मेहमूद यांच्या सांगितिक आयुष्यातलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे 'मिर्झा ग़ालिब'

'दिल की उलझन में पता चलता नहीं
हम कहां हैं,सुबह हैं या शाम हैं,
हम तडपते हैं,नही उनको खबर
क्या मोहब्बत का यहीं अंजाम है '

अशा एका पेक्षा एक सरस गझल असलेल्या या चित्रपटाचे संगीतकार होते गुलाम महंमद!
विशेष म्हणजे सोबत होती सुरैय्या !

'हमको उनसे वफा की हैं उम्मीद,
जो नहीं जानते वफा क्या है..
दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है '

अशा कितीतरी गझल सुरैयाने अमर केल्या.

'यह ना थी हमारी क़िस्मत के विसाल-ए- यार होता
अगर और जीते यहीं
और इंतज़ार होता '

तिच्या डोळ्यांतले भाव वाचतांना तिचा स्वर जास्त भावपूर्ण होतो आहे असं जाणवायचं.
तसं पाहिलं तर जवळपास सगळ्याच गायकांनी कमी जास्त प्रमाणात गझल गायल्या.मोहम्मद रफी,यांचा आवाज सगळ्या गीतांना न्याय देणारा होता.
गझल ही त्यांच्या स्वरातून साकारली ती अविस्मरणीय ठरण्यासाठी!
रफींच्या स्वरांतल्या  'लाल किला'
या चित्रपटाल्या,

'न किसीकी आंख का नूर हूं '
आणि,
'लगता नही हैं दिल मेरा उजडे दयार में '

या बहादुरशहा ज़फर यांच्या गझल म्हणजे मूर्तिमंत व्यथेची प्रचिती होती.
या गझलांना पं. श्रीनाथ त्रिपाठी यांनी संगीत दिलं होतं.बनारसी ठुमरी,होरी,कजरीचे सूर ऐकण्यात बालपण घालवलेल्या त्रिपाठीजींना गझलचा नेमका सूर गवसला होता.
संगीतकार जयदेव यांचं संगीत लाभलेली 'हम दोनो ' चित्रपटातली रफींनी गायलेली ही गझल विसरणं तर केवळ अशक्य !

'मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र धुऐं मे उड़ाता चला गया'

जयदेव अली अकबर खाँ यांचे शिष्य होते.संगीताइतकाच साहित्याचाही त्यांचा व्यासंग विलक्षण होता.फारसी, उर्दू, हिंदी अशा तिन्ही भाषांतल्या काव्याचा त्यांनी अभ्यास केला होता.एखादा शेर वाचतांना उस्फूर्तपणे त्यांची चाल तयार व्हायची.
शायर अदम यांच्या

'मैत्री गर्दिश - ए - जाम लडाता चला गया..
हंसता हंसाता पीता पिलाता चला गया '

हा शेर वाचतांना जी चाल सुचली त्या चालीवर ही गझल साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती.साहीर म्हणजे गझलच्या इतिहासातील देखणे वळण !

किशोरजींची स्टाईलच अफलातून होती.गझलची हळुवार शैली त्यांना मानवेल असं कुणाला वाटलं नव्हतं.पण किशोर कुमार यांच्या स्वराचा आवाका फार विलक्षण होता.
ज्या ताकदीने त्यांनी डाराडूडू ची गाणी गायली तितक्याच ताकदीने हळुवार गाण्यांनाही न्याय दिला.त्यातली उत्कटता, भावुकता अत्यंत नजाकतीने पेलली.

'मेरे दिल में आज क्या है
तू कहे तो मै बता दूं
तेरी ज़ुल्फ फिर संवारुं
तेरी मांग फिर सजा दूं '

यासारख्या थोड्याच पण लक्षात राहाणा-या गझल किशोरकुमार यांनी दिल्या.

एक अनोखा दर्द अशी ओळख असणाऱ्या मुकेश यांच्या स्वरात ही क्वचित काही गझल आढळतात.

'आया है मुझे फिर याद वो ज़ालिम
गुज़रा ज़माना बचपनका
हाय रे अकेले छोड के जाना
और न आना बचपन का '

किंवा,

'छोड चले है महेफिल को
याद आए कभी तो मत रोना
इस दिल को तसल्ली दे देना
घबराए कभी तो मत रोना '

यासारख्या रचना विसरता येत नाहीत.

चित्रपट संगीताच्या त्या सुवर्ण युगात, प्रत्येक गायकाचा एक विशेष असा चेहरा होता.स्वतंत्र अशी ओळख होती.संगीतकार आणि गायक अशा दोन्ही क्षेत्रांत लोकप्रिय असलेल्या हेमंत कुमार यांचा उल्लेख या संदर्भात आवश्यक आहे.
हेमंत कुमार यांच्या स्वराभोवती एक गूढ असं वलय जाणवतं.अंतरंगात खोल उतरणारा त्यांचा स्वर इतरांपेक्षा वेगळा होता.या आवाजाने गझल अधिक समृद्ध झाली.

'तेरी दुनिया में जीने से तो
बेहतर हैं के मर जाए,
वहीं आंसू,वहीं आंहें,
वहीं ग़म हैं,जिधर जाए '

साहीर यांची ही गझल एस.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती.
या व्यतिरिक्त उमादेवी, नूरजहाँ, मुबारक बेगम, शमशाद बेगम यांनी देखील वेगवेगळ्या संगीतकारांच्या दिग्दर्शनात गझल गायल्या होत्या.
'शगून ' चित्रपटासाठी जगजीत कौर यांनी गायलेली

'तुम अपना रंजो ग़म 
अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे ग़म की क़सम,इस
दिल की विरानी मुझे दे दो '

ही गझल खूप गाजली होती.
या गझलला ख़य्याम यांनी संगीत दिलं होतं.
तर उमादेवी यांनी गायलेली

'अफसाना लिख रही हूं
दिल-ए-बेक़रार का
आंखोमें रंग भरके 
तेरे इंतज़ारका '

ही 'दर्द ' या चित्रपटातली गझल लोकप्रिय झाली होती.
लता मंगेशकर
संगीत क्षेत्रातल्या या अनभिषिक्त सम्राज्ञीच्या स्वरात अनेक गझल अजरामर झालेल्या आहेत.लता मंगेशकर यांनी अनेक संगीतकारांकडे गझल गायल्या.मात्र मदनमोहन यांचे गझलवर विशेष प्रेम होते.फैज़ खाँ,अब्दुल वहीद खां यांचं मार्गदर्शन आणि रोशन आरा, बेगम अख्तर यांचा सुरेल सहवास लाभलेल्या मदनमोहनजींवर गझलचा प्रभाव असणं स्वाभाविकच होतं.
राजा मेहेदी अली खाँ, मदनमोहन आणि लता मंगेशकर यांच्या त्रिवेणी संगमातून अनेक अद्वितीय अशा गझलांची निर्मिती झाली.
'अदालत ' या चित्रपटातली ही गझल ,

'युं हसरतोंके दाग मोहब्बत में धो लिए
ख़ुद दिलसे दिलकी बात कही और रो लिए '

म्हणजे मूर्तिमंत वेदना होती.
लतादीदींच्या स्वरातली आर्तता, आणि नर्गिसच्या डोळ्यातला दर्द ! दाद द्यावी तर कोणाला ?
लता मंगेशकर यांनी अनेक गझल गायल्या.

'रहते थे कभी जिनके दिल में
हम जान से भी प्यारोंकी तरह,
बैठे हैं उन्ही के कुंचे में हम
आज गुनहगारोंकी तरह '

यासारख्या आर्त किंवा,

'नग्मा ओ शेर की सौगात किसे पेश करुं
यह छलकते हुए जज़बात किसे पेश करूं '
यासारख्या रोमॅंटिक,सगळ्याच गझल
त्यांनी समृद्ध केल्या.

आशा भोसले यांच्या बद्दल सांगण्या आधी थोडं खय्याम यांच्या बद्दल!
गझल सोबत विशेष ऋणानुबंध असलेले संगीतकार ख़य्याम यांनी चित्रपटातल्या गझलला एक नवीन वळण दिलं.नव्या आकारात,नव्या स्वरुपातली ही गझल आधीच्या गझल पेक्षा थोडी वेगळी होती.या आधी सिनेमातली इतर गाणी आणि गझल यात फारसा फरक केला जात नव्हता.या गाण्यांसाठी वापरली जाणारी,ट्रम्पेट, पियानो हीच वाद्ये गझल साठी वापरली जात होती. ख़य्यामजींनी मात्र गझलची भावपूर्णता लक्षात घेऊन तिच्यासाठी खास सतार, संतूर,सारंगी,
स्वरमंडळ इत्यादी वाद्यांचा उपयोग करून तिची नज़ाकत जपली.गझलेतून साकार होणारी भावना यामुळे जास्त उत्कट झाली.
खय्याम आणि आशा भोसले यांच्या गझलांवर 'उमराव जान ' चित्रपटाने एक मोहोर उमटवली हे तर खरंच पण तरीही या आधी च्या काळातही आशा भोसले यांनी गायलेल्या वेगवेगळ्या मूड्स च्या गझल कशा विसरता येतील?

'चेहरे पे ख़ुशी छा जाती हैं
आंखोमें सुरुर आ जाता है,
जब तुम मुझे अपना कहते हो,
अपने पे गुरुर आ जाता है '

'वक़्त ' चित्रपटासाठी आशाजींनी गायलेलीही मस्तीभ-या मूड ची गझल फक्त त्यांच्या साठीच होती.
उमराव जान, च्या सगळ्या गझल क्लासिक टच असलेल्या होत्या.याच काळात 'बाज़ार ', 'अर्थ ' या सिनेमातून ही दर्जेदार गझल सादर झाल्या.
'अर्थ ' मधे जगजितसिंग यांनी विलक्षण मुलायम गझलचा आविष्कार घडवला.

'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या ग़म है जिसको छुपा रहे हो '

यासह सगळ्या गझल खूप लोकप्रिय झाल्या.
'निकाह ' या सिनेमात गायिका आणि नायिका अशा दोन्ही भूमिका मध्ये सलमा आगा यांनी रसिकांची मने जिंकली.

'दिल के अरमां आंसूओंमें बह गए
हम वफा करके भी तनहां रह गए '

ही गझल लक्षात राहिली.
चित्रपटातल्या गझलांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला आहे.
अर्थात चित्रपटातल्या गझलांची संख्या खूप मोठी आहे.गझलच्या वाटचालीतल्या या महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करण्याचा हा प्रयत्न, एवढंच.
........................
 

3 comments:

  1. खूप सुंदर लेख!

    ReplyDelete
  2. अप्रतिम गझल ....रसास्वाद...

    ReplyDelete
  3. अभ्यास पूर्ण लेख.

    ReplyDelete