तीन गझला : रघुनाथ पाटील

१.
आयुष्याच्या प्रश्नांचे मी उत्तर शोधत बसतो
कधी जगाला कधी स्वतःला उगाच मागत बसतो!

पुन्हा नव्याने सुरू चौकशी त्यांच्याकडून होते
पुन्हा नव्याने व्यथा मनाची त्यांना सांगत बसतो!

घाव घालून स्वप्नांवरती वास्तव निघून जाते
भग्न मनाचे अगणित तुकडे मग मी जोडत बसतो!

वेळच नसतो कुणास येथे हल्ली कोणासाठी
बळेबळे मग स्वतःशीच मी काही बोलत बसतो!

तिने दिलेले मोरपीसही अजून तसेच आहे
तिची आठवण येते तेव्हा ते कवटाळत बसतो!

गतकाळाचे दिवस न उरले सारे सरले परंतु
कुणास ठाउक डायरीस मी का न्याहाळत बसतो!

कधी कधी इतका कंटाळा येतो म्हणून सांगू
जगास सोडा स्वतःलाच मी तेंव्हा टाळत बसतो!

२.
                        
वास्तवतेची आग नेहमी सोसत आलो
अन् स्वप्नांच्या सरणावरती झोपत आलो!

नात्यांमध्ये वाटत गेलो जीवन अवघे
स्वतः करीता कधी न काही मागत आलो!

किती पार मी अंतर केले कळले नाही
आयुष्याच्या सोबत केवळ चालत आलो!

विरहाचा तो काळच इतका छळून गेला
तुला भेटण्या हरणासमान धावत आलो!

असे वाटले आज स्वतःला नक्की भेटू
परंतु दुनियेसाठी तेही टाळत आलो !

दुःख म्हणाले, "कविराजा येऊ का आता?"
पुन्हा तयाला नविन तारीख मागत आलो!

उशिरा कळले दुनियेला तर वेळच नाही
उगाच येथे व्यथा मनाची सांगत आलो!

कोण म्हणाले गझल फुलांची अन् ता-यांची?
मी तर सदैव अंगा-यावर चालत आलो!

३.
                         
फाटक्या नभा तुलाच आता सांधायाची इच्छा
आणि समुद्राच्या खोलीला मापायाची इच्छा!

कुणी कितीही वाइट वागो ज्याचे त्याच्यापाशी
मला परंतु फक्त चांगले वागायाची इच्छा!

वय वाढुनही मनात अवखळ मूल अजूनी बाकी
अजून दगडाने कैरीला पाडायची इच्छा!

प्रेम तुझ्यावर खरेच करतो बोलत आलो आहे
सत्तरीतही बायकोस हे सांगायाची इच्छा!

अहंपणाला अमरत्वाचे दान असावे बहुधा
मनात माझ्या तरी तयाला मारायाची इच्छा!

नास्तिकतेचा खुशाल शिक्का मारो मजवर कोणी
जुनाट सडक्या परंपरांना गाडायाची इच्छा!

ठेचकाळलो खाली पडलो हरकत नाही मित्रा
शर्यतीत पण आयुष्याच्या धावायाची इच्छा!
....................
रघुनाथ पाटील
पिंपरी चिंचवड

No comments:

Post a Comment