१.
हवे कशाला आढे वेढे, बोलायाचे सरळ सरळ
जुळून यावे सूर आपल्या, संवादाचे सरळ सरळ
आनंदाचे असते कोठे? संघर्षाचे जीवन हे
येतिल जे जे भोग नशीबी, भोगायाचे सरळ सरळ
झाकायाचे नाही काही, जातांना बघ ताकाला
भांडे अपुल्या हातामधले, दावायाचे सरळ सरळ
इच्छा आशा आकांक्षांना, डांबायाचे उगाच कां?
काय हवे अन् काय नको ते, मागायाचे सरळ सरळ
खेळी आहे हत्तीची अन्, समोर शत्रू दिसतो तर
चाल कशाला उंटाची मग? चालायाचे सरळ सरळ
ओठांवरती उगाच छद्मी, हसू कशाला आणावे
खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे, हासायाचे सरळ सरळ
स्वीकारावी मैत्र विनंती, समृद्धीची आलीतर
अठरा विश्वे दारिद्र्याला, टाळायाचे सरळ सरळ
२.
सोबत सोबत चालत गेलो, याचे त्याचे ऐकत गेलो
जो तो अपुली फेकत गेला, सर्वांचे मी झेलत गेलो
सच्चे झूटे किस्से त्यांचे, ऐकुन सारे मनी ठेवले
येता पाळी माझी तेथे, मी ही माझे पेलत गेलो
टिका टिप्पणी करणाऱ्यांची, तोंडे तेव्हा बंद जाहली
जेव्हा मी त्या एकेकाला, चौकामध्ये ठेचत गेलो
राजा होतो राजा आहे, राजा राहिन साम्राज्याचा
उगाच नाही येथे मी बघ, ती परिधाने नेसत गेलो
पडता पडता शिकलो येथे, चाली साऱ्या मी जगण्याच्या
ज्ञानावर त्या गाडा माझा, विश्वासाने खेचत गेलो
सागरात या स्वानुभवाच्या, पोहत डुंबत आनंदाने
शिंपल्यातले मीच श्रमाचे , मोती माझे वेचत गेलो
३.
आघात होत आहे अन् घात होत आहे
देशात माणसांचा, नि:पात होत आहे
दररोज मित्र माझे, जातातहेत निघुनी
हे वार काळजावर, खोलात होत आहे
झाली अनाथ पोरे, मृत्यूत पालकांच्या
संवाद लेकरांचा, दु:खात होत आहे
डांबून जीव सारे, असती घरात अपुल्या
परिपाक या स्थितीचा, वेडात होत आहे
संचार बंद झाला, शहरातला अताशा
पण मुक्त हालचाली, गावात होत आहे
कर्तव्य चोख जर ते, होतो विनाश कैसा?
हयगय पहा कुणाच्या, कामात होत आहे
......................
अनिल जाधव
अमरावती
94228 57060
छान
ReplyDelete