तीन गझला : डॉ. शिवाजी काळे .


१.

छुपी लढाई लढताना तो अगतिक झाला आहे
प्रत्येकाचा मेंदू हतबल सैनिक झाला आहे

प्रारब्धाची हूल देउनी प्राण पळवले त्यांनी 
काळ कोडगा आणि विधाता दांभिक झाला आहे

उभ्या जगाचे एकसारखे भाग्य रेखले कोणी ? 
(भविष्य बघणाऱ्याचा मुखडा त्रासिक झाला आहे)

सुपातल्यांची बघून तगमग हात जोडले त्याने
जात्यामधला अखेरचा क्षण आस्तिक झाला आहे

कवचकुंडले तपासण्याची ज्याला त्याला घाई !
नव्या युगाचा मृत्यू आता ऐच्छिक झाला आहे

जागा खाली करण्याचे जर कारण कळले नाही 
प्रश्न विचारत नाही आत्मा सोशिक झाला आहे

तलवारीची धार कशाने बोथट झाली आहे
वार कदाचित पात्यावरती शाब्दिक झाला आहे

संथपणाच्या क्षितिजावरचा प्रपात दिसला नाही 
म्हणून माझ्या नावेचा तो नाविक झाला आहे

कुणी मालकी सांगितली तर हसून उत्तर देतो
आता भोळा शिवा मनाने वैश्विक झाला आहे

२.

नकोस देऊ राम तुझा वा शाम तुझा
दे निर्मोही भक्तीचा आयाम तुझा

तुझ्यासारखा मला स्वतःचा काळ कुठे
मला फुलवतो फुलण्याचा हंगाम तुझा

निघण्याआधी नजर भिडव तू नजरेला
टिकतो का निर्धार बघू मग ठाम तुझा

कधीच काही मागत नाही आस तुझी
का छळतो हा मोह मला निष्काम तुझा

उन्हात वावरताना सावर देह तुझा
माझ्या डोळ्यांमधून गळतो घाम तुझा

सावरण्याचे सांग किती सायास करू
ऋतू मनावर आदळतो बेफाम तुझा

प्राजक्ताचा बहर इथे अन् सडा तिथे
सुगंध होतो तुझ्यामुळे बदनाम तुझा

३.

भरदुपारी शिवार आठवते
आजही ती दुपार आठवते

कातळाला अखंड म्हणतो मी
आणि त्याला कपार आठवते

जर मनाचा बुरूज ढासळला
ऐनवेळी भुयार आठवते

हे कुणाचे उदासवाणे घर
भिंत कसला प्रहार आठवते?

ते मला घेरतात एकांती
मग मलाही शिकार आठवते

हा पराभव इथेच विसरुन जा
शेवटी जग थरार आठवते

जन्म विश्वासघात करणारच
मृत्युवरची मदार आठवते ? 

पट्टराणी उदास का दिसते
(ती भुकेचे प्रकार आठवते)

अन्य काहीच आठवत नाही 
एक प्रेमळ कट्यार आठवते
.

3 comments:

  1. मनःपूर्वक आभार संपादक मंडळ !

    ReplyDelete
  2. अप्रतिम सर
    तुमच्या गझल वाचणे हा अभ्यास आहे.

    अंजली मराठे

    ReplyDelete
  3. निव्वळ अप्रतिम गझल भाऊ!!👌👌👌

    ReplyDelete