१ .
हसवणारे, खिदळणारे इथे कोणीच नाही
रिते अंगण, मुकी दारे इथे कोणीच नाही
मनाला त्रास देणारे हजारो भेटलेले
मनाला शांत करणारे इथे कोणीच नाही
कुणावरती लिहावे मी? कुणाचे गीत गावे?
फुले, पाने, नदी, वारे इथे कोणीच नाही
दरेकाच्या मुखावरती हसू आहे तरीही
मनापासून हसणारे इथे कोणीच नाही
कुठे गेला जुना कट्टा?कुठेगप्पा हरवल्या?
गड्यांनो या, पुन्हा या रे इथे कोणीच नाही
२.
मागचे येतील नंतर...जा पुढे
लाव पहिला तूच नंबर...जा पुढे
लाट तू उठवू नको पाण्यावरी
शांत राहू दे सरोवर..जा पुढे
धाव जोराने, नको मागे बघू
पोच सगळ्यांच्या अगोदर.. जा पुढे
आसरा देऊ कसा, कोठे तुला ?
मी असा बेकार, बेघर...जा पुढे
जी हवी ती माणसे गेली पुढे
गाठण्या त्यांना भराभर जा पुढे
- केदार पाटणकर
No comments:
Post a Comment