तीन गझला : बबन धुमाळ

१.

चाललेली झुंड शहरी भाकरीसाठीच होती 
ते म्हणाले... लोक वारी पंढरीसाठीच होती 

वाटले साऱ्या जगाला केवढे धाडस तिचे हे 
बिलगली कृष्णास राधा बासरीसाठीच होती 

एक धागा लागला हाती विचारांती असा की 
जुंपलेली ही लढाई बाबरीसाठीच होती 

एक त्याने पोसलेला भ्रम असा होता मनी की 
जन्मलेली मेहुणी ही मस्करीसाठीच होती 

कोण म्हणतो इंग्रजांचे प्रेम होते भारतावर 
शिकवली त्यांनी पिढी तर चाकरीसाठीच होती 

केवढा हा ऊत आला चोरट्या मालास येथे 
देव जाणे काय वर्दी तस्करीसाठीच होती 

बोलण्याला का मवाळी आज दादाच्या कळाली 
एवढी खातीरदारी स्वाक्षरीसाठीच होती 

२.

हीच माझ्या काळजाला लागलेली टोचणी 
श्वास घेण्या  लागते द्यावी  इथे का खंडणी 

पाहिलेला काळ आहे या जगाने एकदा 
कोणही का थांबवत नाही अणूची चाचणी 

कान भरल्यावर गुणी वेडावतो इतका कसा 
धाकट्या भावास मागे वाटणीवर वाटणी 

खूप सुंदर बायकोने सजवला संसार पण 
त्रास देते फार आता मागणीवर मागणी 

आटल्या साऱ्याच विहिरी आटलेली आसवे 
सांग ना आता कशी रानी करावी पेरणी 

वेदना फोफावल्या समजून घेणारा कुणी 
जन्मला देशात नाही का कुणीही धोरणी 

ना कुणी येणार दुसरे वारण्याला दुःख हे 
जन्म देशाच्या इथे तू लाव आता कारणी 

३.

चार भिंती आत माझी कबर आहे 
सोसलेल्या वेदनांची बखर आहे 

वाहते धमण्यातुनी जे आज माझ्या 
रक्त नाही जीवघेणे जहर आहे 

तेज जे डोळ्यात दिसते दाटलेले 
आतल्या दुःखास आला बहर आहे 

टाळले त्यांना तरी करतात गर्दी 
आठवांनी मांडलेला कहर आहे 

वाटले डोळे मिटावे मी सुखाने 
लेकरांचे मोकळे पण उदर आहे 

आत्महत्या ती नव्हे तर खून होता 
नेमकी खोटी दिलेली खबर आहे 

संपला समजू नको हरल्यावरी मी 
हात करण्या दोन अजुनी जिगर आहे 

सागरी दिसते तुला ते बेट नाही 
ती शिकारी झोपलेली मगर आहे 

हूल त्याला द्यायची तर दे म्हणावे 
बारमाही वाहणारी नहर आहे 

No comments:

Post a Comment