महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे रसिकप्रिय कवी, गझलकार, लेखक, ज्येष्ठ पत्रकार कै. मधुसूदन नानिवडेकर. ९ व्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष असलेले नानिवडेकरांचे नाव घेतले की, 'तू जन्माची भूल ' आणि 'हरकत नाही ' ह्या त्यांच्या गझला आधी ओठांवर रुंजी घालतात. मनाचे तरल भावबंध गुंफणारा आणि जाणिवांचे संदर्भ मांडणारा नानिवडेकर यांचा 'चांदणे नदीपात्रात ' हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाची पुणे विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या काव्यसंग्रहास लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणचा अत्यंत प्रतिष्ठेचा कविवर्य द्वारकानाथ शेंडे विशेष साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. युआर एल फाउंडेशनचा गझल गौरव पुरस्कार, अष्टपैलू कलामंचचा गझल भूषण पुरस्कार कोमसापचा कवी माधव पुरस्कार असे अनेक पुरस्कार नानिवडेकर यांच्या शिरपेचात खोवलेले आहेत.
मधुसूदन नानिवडेकर यांनी दैनिक पुढारी मध्ये काही काळ उपसंपादक म्हणून कार्य केले. २०२१ अर्थात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते महाराष्ट्र टाइम्सचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानिवडेकर या त्यांच्या जन्म गावाच्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते. एक राजकारणी माणूस आणि तोही गझलकार अगदीच जगावेगळे समीकरण वाटतं ना! पण ….हे खरं आहे. प्रशासन सेवेत कार्य करत असताना त्यांनी समाजातील तळागळातील समस्या जाणून घेतल्या. सरकारी योजना आणि सामान्य माणूस या सर्वांचा ताळमेळ घालून कधी टीकात्मक लेखन तर कधी सकारात्मक लेखन ते करत असत. प्रशासकीय सेवेतील अतिशय रूक्ष भाषेचा सुद्धा त्यांनी आपल्या लेखन कौशल्याने योग्य वापर केला. राजकारण असो वा शिक्षण क्षेत्र, अलंकृत ललित लेखन असो वा वैचारिक लेखन, साहित्यातील प्रत्येक साहित्य प्रकार ते लीलया साकारत असत. त्यांच्या खालील सुट्या शेरांवरून हे वाचकांच्या सहज लक्षात येईल.
धनादेश सत्तर रुपयाचा
पाऊणशे त्याची वटणावळ
निधी कमी पडणाच नाही
सुभाषित हे किती भयंकर
रोज त्याच त्या सभा बैठका
ठराव झाले फक्त ढीगभर
अनेकदा नात्यांमधील ओलाव्याचे पेट्रोल संपल्यावर धक्का मारत मारत नाते पुढे रेटत न्यावी लागतात. ओढ, उत्कटता केव्हाच निखळून गेल्यावर प्रेमाचे इंजिन वारंवार रिपेयर करून करून एस टी महामंडळाच्या गाड्यांप्रमाणे नाती पुढे पुढे सरकवावी लागतात. केवळ जीवनाचे रहाटगाडे पुढे पुढे चालावे यासाठी.व्यवस्थापनाचा सुरेख ताळमेळ आयुष्याशी जोडून त्यांनी आपल्या लेखनातून वास्तवदर्शन घडवले होते.
प्रेम डबघाईला येत आहे तरी
चालवू या महामंडळासारखे
माहितीच्या अधिकारालाही त्यांनी सोडले नाही. माहितीच्या अधिकाराचा योग्य उपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त होतो. शृंगार रसाची रसात्मकता त्यांनी माहितीच्या अधिकाराकडे सूचकता दर्शविण्यासाठी अगदी चपखलपणे वापरली.
माहितीचा दे मला अधिकार थोडा
ये गडे लाजू नको आता जराही
'सिंधुदुर्गचे सुपुत्र ' मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघिवरे गावात १८ मे १९६० रोजी झाला होता. नानिवडेकरांनी आपल्या आईकडून कविता लेखनाची प्रेरणा घेतली होती. त्यांच्या आईंना श्लोक तोंडपाठ असायचे. त्या नेहमी काहीतरी गुणगुणत राहायच्या. एक दिवस लहानपणी मधुसूदन आपल्या आईसोबत पाणी आणायला विहिरीवर गेले. तिथे एक स्त्री भर उन्हात पायाला कुंभ्याची पाने बांधून पाणी भरायला आली होती. त्या पानांतूनही तिचे पाय पोळत होते. तिच्या वेदनांतून नानिवडेकरांच्या पहिल्या कवितेची निर्मिती झाली. १९७७ सालापासून ते कवितेच्या प्रेमात पडले आणि तिथून त्यांचे संपूर्ण आयुष्याचे संदर्भ बदललेत. वयाच्या सतराव्या वर्षांपासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. 'ठेव तू मनातल्या मनात' ही कविता गझलसम्राट सुरेश भट यांच्या निदर्शनास आली. सुरेश भट यांनी नानिवडेकर यांना गझललेखनास प्रोत्साहन दिले. त्यानंतर ते गझलेकडे वळले. संपूर्ण महाराष्ट्रात ते गझलकार व साहित्यिक म्हणून लोकप्रिय झालेत. नानिवडेकर आपल्या लिखाणातून भावभावनांच्या कुंचल्यातून जाणिवांचे आशयघन संदर्भ रेखाटत. एक संवेदनशील कवी, एक प्रतिभावंत गझलकार, एक दर्जेदार साहित्यिक, पत्रकार, राजकर्ते म्हणून ते जेवढे ओळखले जातात. तेवढेच एक हळव्या मनाचा साधा सरळ माणूस म्हणून मधुसूदन नानिवडेकर यांना त्यांचे निकटवर्तीय ओळखतात. त्यांच्या स्वभावातील विनोदी शैली सुद्धा रसिकांना चांगलीच परिचित आहे. 'मधुमिश्किली' या आपल्या खास विनोदी शैलीतून ते रसिकांशी थेट मधुसंवाद साधतात. हसत खेळत रसिकांना खिळवून ठेवून आपल्या बहारदार रचनांनी मैफिल गाजवतात. विनोदी शैलीतून ते समाजातील व्यंगावर, अनिष्ट रूढी परंपरांवर भाष्य करतात. त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत असले तरीही मराठी साहित्यात ते निपुण होते. मराठीच्या प्राध्यापकांच्या तोडीस तोड त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. कितीही बिकट परिस्थिती असली तरीही खळखळून हसायचे. विनोदी शैलीतून त्यावर व्यंग करत स्वतःलाच सकारात्मक प्रेरणा द्यायचे. 'हरकत नाही' हे जणू त्यांच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य होते. नानिवडेकर यांची अतिशय लोकप्रिय गझल 'हरकत नाही' त्यांच्या मिश्किल स्वभावाला अधोरेखित करते.
हासलीस तू नुसते वरवर हरकत नाही
म्हणालीस तू भेटू नंतर हरकत नाही
घड्याळात पाहिले तिने.. पण समजून गेलो
निघावयास नानिवडेकर हरकत नाही
महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात त्यांना बोलावले असतांना त्यांनी सादर केलेली गझल ऐकून सर्व विद्यार्थी त्यांच्या गझला व कविता अक्षरशः डोक्यावर घेत असत. नानिवडेकर आणि प्रेम कविता, विनोदी कविता यांचे जुने समीकरण आहे. मंगेश पाडगावकर यांची 'जिप्सी ', कुसुमाग्रजांचा 'विशाखा' जसा तरुणाईला भुरळ पाडतो त्याचप्रमाणे नानिवडेकरांच्या प्रेम कविता, गझल तरुणाईला बेधुंद करतात. टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सभागृह गुंजत असे.
कसे मी जगावे स्वभावाप्रमाणे
तुलाही हवा मी ठरावा प्रमाणे
असा राग येतो तुझा रोज हल्ली
तरी हासतो मी सरावा प्रमाणे
अखेरीस ती त्यास सांगून गेली
(अरे, तू मला फक्त भावाप्रमाणे)
अशा रचनांनी रसिक आपलं सर्व सुखदुःख क्षणभर विसरून खळखळून हसत. सादरीकरण कौशल्य शिकावे तर ते नानिवडेकर यांच्याकडूनच. त्यांची रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी संवादफेक त्यात त्यांचे चोख पाठांतर अगदीच सर्व अद्भूत! कोजागिरीच्या मैफिलीतील त्यांचे सादरीकरण म्हणजे जणूकाही आकाशातील 'चांदणे नदीपात्रात ' उतरले. त्यांची प्रत्येक मैफिल म्हणजे साहित्यिक मेजवानी. समोर बसलेल्या रसिकांच्या हृदयाचा अचूक वेध घेऊन समयोचित काव्यपंक्ती, शेर, विनोदाचे चांदणे ते बेमालूमपणे उधळत असत. वसंतातील चैत्रमास असो वा कोजागिरी मैफिलित रंग भरणे एवढेच काय ते त्यांना माहीत होते. ते म्हणत -
अंतरात नेहमीच
चैत्रमास पाहिजे
पालवीसही नव्या
जुना सुवास पाहिजे
हे सर्व फक्त अनुभवावं, त्यावर लिहिणे शक्य नाही. त्यांची एक षडाक्षरी रचना जी त्यांनी सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत सादर केली होती. ती त्यांच्याच शैलीत ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यातील काही ओळी…..
हल्ली तू पाऊस
पिऊन घेतेस
पाऊस पिऊन
बेभान होतेस
बेभान होताना
माझेच एकांती
नाव तू कशाला
उगीच घेतेस
रसिकांच्या वाहवात नानिवडेकर कधी वाहून गेले नाहीत. प्रतिभेचं देवदत्त लेणं लाभलेलं असतांनाही त्यांना त्याचे भूषण नाही. 'मला कुठे काय येतंय?' असे ते सहजपणे बोलून जात. त्यांच्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाचे प्रगटीकरण करणारा त्यांचाच एक शेर
मी लिहू शकणार नाही आत्मवृत्ताचे रकाने
तेवढा आहे कुठे साधासुधा इतिहास माझा
गझल, कविता लेखनात अपेक्षित असते तो मनांचा थेट संवाद. भावभावनांची व्यक्तता, तसेच मानवी वृत्तीचे बारकावे, निसर्गवर्णन, प्रेम, विरह, सुखदुःख, सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ नानिवडेकर यांच्या कवितेत हे सर्वच आहे. म्हणूनच गेली कित्येक दशकं ते रसिक वाचकांच्या हृदयावर विराजमान आहेत. त्यांच्या कित्येक कविता आणि गझलांची गाणी झालीत. शृंगार आणि प्रेम हा स्थायीभाव त्यांनी जिवंत ठेवला आहे. पतिपत्नी यांच्या अतूट नात्यात होणाऱ्या थोड्या कुरबुरीतही गझल तयार होऊ शकते? यावर विश्वास बसत नाही ना! पण ते मधुसूदन नानिवडेकर यांनी करून दाखवले. त्यांच्या अनेक गझलांना गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपले स्वरसाज चढवून घराघरातून देशविदेशात पोहचवले आहे.
भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस
क्षणभर थांबून गडे, मोज जुने आराखडे
घाव नवे त्यावर तू, मीठ किती सांडतेस?
प्रेयसी रुसली असेल तर तिचा रुसवा सोडवण्यासाठी अतिशय सुंदर गझल त्यांनी लिहिली आहे. नानिवडेकर सर नवरंग चित्रपटातील नायकाप्रमाणे आपल्या पत्नीलाच प्रेयसी समजून रचनांची निर्मिती करतात.
हा अबोला ठीक नाही
बोल बाई बोल काही
पापण्यांनी बोलण्याचे
कोणती आहे तऱ्हा ही
भांडण झाल्यावर पत्नीशी बोलण्याची सुद्धा त्यांची हिंमत होत नसे. अशावेळी ते गझल लिहायचे भांडणं झाली तरी गझल, रुसवा - अबोला असला तरी गझल लिहायचे. आनंद, दुःख आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला व घटनेला अनुसरून कुठल्याही परिस्थितीत गझल आणि कविता लिहिणारे नानिवडेकर हे एकमेव कवी, गझलकार होते. बोलत असतानाही ते सहजपणे कविता करून जायचे तेही वृत्तबद्ध! त्यांच्याशी चाललेल्या संवादातून इतरांच्याही कविता तयार व्हायच्या. बोलता-बोलता ते त्यांच्या लयबद्ध कविता, शेर गाऊन दाखवायचे त्यांना आवडलेल्या कवी, गझलकारांच्या कविता, शेर देखील त्यांना मुखपाठ असायचे. पत्नीला चहा करून मागण्याची हिंमत होत नव्हती मग त्यावरही गझल लिहिली विशेष म्हणजे त्यांना त्यानंतर चहा मिळाला तेही न मागताच! त्यांच्या पत्नीने त्यांचे हे गझलप्रेम आयुष्यभर जपले.
तुझ्याकडे मागावे काही
ही तर माझी हिम्मत नाही
समजून काही द्यावे घ्यावे
तुझी तेवढी दानत नाही
प्रेमाचा व्यवहार खुला हा
करार नाही करावयाचा
किती द्यायचे किती घ्यायचे
कुणीच आधी ठरवत नाही
लय आणि आशयसमृद्धीचे धनी असलेले गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर नवोदितांना कविता व गझललेखनात न कंटाळता मार्गदर्शन करत होते. नवोदितांना आपल्या ज्ञानाचे, आपल्या अनुभवाचे दान देतांना ते हातचे काही राखून ठेवत नसत. त्यासाठी त्यांनी अनेक काव्य, गझललेखनाच्या कार्यशाळा घेतल्या. ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून ते कार्यशाळा घेत असत. नवोदितांचे ते दीपस्तंभ व भरभक्कम आधारवड होते. नवोदितांच्या कविता आवडल्या तर त्यांना ते पत्र पाठवत असत. असंच एक पत्र त्यांनी हिंमत डांगे यांना पाठवून त्यांची मेनका वृत्तातील गझल आवडल्याचे कळवले होते. कालांतराने सोशल मीडियाच्या जगात ते फोन करून आणि मॅसेज देऊन कविता आवडल्याचे कळवत असत. आवडलेल्या साहित्यावर दिलखुलासपणे खुली दाद प्रथितयश तसेच नवोदितांनाही द्यायचे. नवोदितांना सहसा असे ज्येष्ठ आणि लोकप्रिय साहित्यिक दाद देत नाहीत परंतु नानिवडेकरांच्या ठायी कुठल्याही गर्व, अहंकाराचा लवलेशही नव्हता. त्यांना प्रत्यक्षात कधीही न भेटलेले नवोदित सुद्धा त्यांच्याशी संवाद साधून आज प्रथितयश साहित्यिक झाले आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. बोलता बोलता त्यांनी पारिजातकावर कविता केली मी पारिजातकावर गद्यात लालित्यपूर्ण शैलीत बोलले. ते मला लगेच म्हणाले, ''तू ललित छान लिहू शकतेस. '' इतकेच नव्हे तर ते सारखा पाठपुरावा करत राहिले. मी 'आनंदाने बहरलेला प्राजक्त ' हा ललित लेख लिहिला. पहिलाच ललित लेख अक्षरबंधच्या दिवाळी अंकातून अतिशय लोकप्रिय झाला. त्या लेखामुळे मला जनमंगल साप्ताहिकात ललित लेखनाचे सदर मिळाले ते आजतागायत सुरू आहे. असे अनेक नवोदित हात नानिवडेकरांनी लिहिते केलेत. नवोदित ज्येष्ठ असा कधीही भेदभाव मनात न बाळगता साहित्य दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यास मान देत असत. मा. नामानंद मोडक यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नानिवडेकर यांनी दीपप्रज्वलन करत असतांना उपस्थितांपैकी सरिता पवार या नवोदित कवयित्रीला व्यासपीठावर बोलवून आपल्यासोबत दीपप्रज्वलनाची संधी दिली होती. आज त्या कोकणातील सुप्रसिद्ध कवयित्री आहेत.
ते नेहमी म्हणत असत, ''जुन्या लोकांनी नवोदितांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना आपल्या सोबत नेले पाहिजे." नानिवडेकर नवोदितांसाठी सकारात्मक ऊर्जा स्त्रोत होते. ते केवळ मार्गदर्शन करत नव्हते तर त्यांच्या ओळखीतील वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून नवोदितांचे साहित्य ते प्रकाशित करत असत. कविता गझललेखना सोबतच सादरीकरणाचे कौशल्यही ते विकसित करत असत. इतकेच नव्हे तर नवोदितांच्या संग्रहाला प्रस्तावना देऊन त्यांना साहित्य वाटेवर धीटपणे चालण्यास प्रेरणा देत असत. ज्येष्ठ साहित्यिक असो वा नवोदित प्रस्तावनेत ते आपले मत स्पष्टपणे मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा आज सर्वांनी अनुसरायला हवा. नवोदितांवरच नव्हे तर जुन्या दिवंगत आणि दिग्गज साहित्यिकांनाही अडगळीत टाकणारी एक फळी प्रत्येक काळात असते. फक्त ताशेरे ओढण्यात ती स्वतःला धन्य समजत असते. अशा लोकांचा खरपूस समाचार ते आपल्या भाषणातून लेखातून घेत असत. वि. स. खांडेकर साहित्यिकच नव्हते असे विधान राजरोसपणे करणाऱ्या साहित्यिकांनी खांडेकरांसह कोकणात होऊन गेलेल्या साहित्यिकांवर नजर टाकावी असे त्यांनी कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर संपादित आणि 'सत्वश्री प्रकाशन 'तर्फे प्रकाशित 'सिंधुसाहित्यसरिता ' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे लिहिलेले आहे. मराठी साहित्याच्या समृद्धीत भर घालणारे कोकणातील अनेक मराठीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले परंतु त्यांचे देदीप्यमान कार्य आणि त्यांनी निर्माण निर्माण केलेल्या वैभवशाली साहित्यकृतींचा परिचय नवीन पिढीला व्हावा म्हणून कोमसापच्या मालवण शाखेने 'सिंधु साहित्य सरिता' हे पुस्तक प्रकाशित केले कोकणातील २१ साहित्यिकांचा परिचय मालवण कोमसापच्या १६ नव लेखकांनी केलेला आहे ते पुस्तक आजही सर्वत्र गाजत आहे. या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे नानिवडेकर यांची 'जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम ' या शीर्षकाखाली लिहिलेली प्रस्तावना!
ते अगदीच स्पष्ट वक्ते होते.ह्याचे उदाहरण द्यायचे म्हणजे कणकवलीचे डॉ. सतीश पवार यांनी त्यांना आपल्या 'मी कवी थातुरमातुर' या पहिल्या काव्यसंग्रहात शुभेच्छा देणारा त्यांचा अभिप्राय मागितला परंतु बरेच दिवस त्यांनी अभिप्राय दिला नाही तेव्हा डॉ. पवारांनी त्यांना मॅसेज करून सांगितले की, फक्त तुमचा अभिप्राय राहिलाय. तेव्हा ते आपल्या स्पष्टवक्त्या शैलीत म्हणाले, "तुम्ही सांगाल आणि मी लिहीन असा मी सांगकाम्या कवी नाही परंतु तुमचा पहिला संग्रह आहे त्यामुळे मी निगेटिव्ह काही लिहिणार नाही. निगेटिव्ह आढळले तर ते खाजगीत सांगेन."
फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीच्या मागे अनेक साहित्यिक प्रस्तावना, अभिप्राय घेण्यासाठी मागे लागलेले असत. डॉ. सतीश पवारांच्या मते, 'हा प्रतिभेने शिक्षण व्यवस्थेवर घेतलेला कडकडीत सूड! '.मधुसूदन नानिवडेकर कमी शिकलेले होते परंतु मराठीच्या प्रचुर पंडिताला लाजवेल असे त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. 'मराठीचे संदर्भ साहित्य' म्हणून ते कोकणात सुप्रसिद्ध होते. मराठी साहित्यातील कुठलाही प्रश्न विचारा उत्तर तयार! देहाची उंची कमी असलेल्या नानिवडेकरांच्या साहित्याची व बुद्धिमत्तेची उंची कोणत्याही फूट पट्टीत मोजता न येण्याइतपत मोठ्ठी होती. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान 'याचे मूर्तिमंत उदाहरण.
कोकणातील नानिवडेकर हा 'संदर्भ साहित्य' सर्वांसाठी खुला होता. ते कोमसापचे अविभाज्य भाग होते. कोणताही कार्यक्रम असला की त्यांची हजेरी असे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांना त्यांचे साहित्यिक मार्गदर्शन असायचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या कोमसापचे २०१३ ते २०१८ एकूण पाच वर्षे ते अध्यक्ष होते. अगदी सहज सोप्या शब्दात ते वाचकांच्या काळजात घर करून जायचे. या काळजाचा त्या काळजाशी थेट संवाद घालण्यासाठी "सोपे लिहावे आणि सोपे लिहीणेच कठीण आहे" असे ते नेहमी म्हणत. निरनिराळी उदाहरणेआणि दाखले देऊन ते सोप्या पद्धतीने नवोदितांना समजावून सांगत. काव्य म्हणजे काय असे विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर वरील विवेचनाचे समर्थन करते.
'माणसाला एक चेहरा असतो. चेहऱ्याच्या आत एक मन असते. मनाच्या आत आणखी एक मन असतं. तिथेच कुठेतरी हृदय असतं आणि एक काळीजही असतं. त्या काळजाच्या आत एक जाणिवेचा खोपा असतो. त्या खोप्यात अनेक कप्पे असतात. त्या कप्प्यातून जे उद्गार बाहेर पडतात ते काव्य.' नानिवडेकरांची वाक्ये कविता होऊन नवोदितांच्या कोऱ्या हृदयावर कोरल्या जातात. गझलेला सर्वसामान्य लोकांच्या काळजात रुजवण्याचे अमूल्य कार्य त्यांनी केले. नवी मुंबईत वाशी येथे ११ नोव्हेंबर २०१७ रोजी भरलेल्या नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोकणभूमीला अध्यक्षपदाचा हा सन्मान पहिल्यांदा मिळाला तो केवळ नानिवडेकर यांच्यामुळे. व्यासपीठावर आचरे गावाचा सत्कार झाला. अध्यक्षीय भाषण करतांना आनंदनाने सद्गदित होऊन त्यांचे हृदय भरून आले. त्यांचे ते अध्यक्षीय भाषण खूप गाजले होते.
मधुसूदन नानिवडेकर भावभावनांचे हळवे मनतरंग गुंफतांना त्यांचा गुंता होणार नाही ह्याची काळजी घेतात. कल्पनाविश्वात रमण्याबरोबरच वास्तव जीवनातील समस्या देखील त्यांनी आपल्या लिखाणातून रेखाटल्या आहेत. शिक्षणसंस्था, प्रशासकीय कारभार ते तंटामुक्ती पर्यंतचे सर्व प्रश्न त्यांच्या कविता नि गझलेत आलेत. 'गझलमाधुर्य ' म्हणून त्यांना संबोधले जायचे. कोकणात तर कुणी दुःखी, आजारी असेल तर त्या व्यक्तीला नानिवडेकरांच्या विनोदी व हलक्याफुलक्या कविता, गझल ऐकवल्या जातात. त्यांच्या मिश्किल शैलीचे आणि गालावरच्या खळीचे अख्खा कोकण प्रांताला वेड लावले होते. सकारात्मक ऊर्जा तसेच अश्रूंच्या फायामधून अत्तर फवारणी करत त्यांची गझल खट्याळ, खोडकर होत शेवटी सुखांतिकेत निरोप घेते.
नानिवडेकर यांच्या गझलेतील काही शेर काळजावर वार करून जातात -
मी कधी केली न माझ्या वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची साजरी साधीच केली
घावही त्यांनीच केले दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची भाषणे त्यांनीच केली
'कोकण Now ' या प्रसिद्ध चॅनल द्वारे मा. विजय शेट्टी यांनी कोकणातील कवींच्या काव्यसादरीकरणाचा 'प्रभाते मने' हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे नानिवडेकर प्रमुख mentor होते. अलीकडच्या काळात नानिवडेकर पत्रकारितेमुळे तळेरे येथे राहत होते. पत्रकार असूनही नानिवडेकर अत्यंत हळव्या मनाचे होते. कधीही कुणाचेही मन चुकूनही दुखावत नसत. त्यांना कोणी वाकडे बोलले तरीही ते वाकड्या शब्दांत प्रतिउत्तर देत नसत. आतल्या आत त्यांच्या मनाला ती टोचणी सतत बोचत असे. त्यातूनच आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची. ताण -तनावाने वरचेवर त्यांची तब्येत बिघडत असे. सतत उच्च रक्तदाब व मधुमेह वाढल्याने ते वारंवार आजारी पडत. अति विचाराने त्यांना सतत थकवा जाणवत असे. अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले.
अवेळीच हा पाऊस आला
घरटे माझे भिजून गेले
आणिक माझे प्राक्तन आता
पावसात वणवणते आहे
पावसातही वणवण भटकणारी एक व्याकुळता आता कायमची विसावली आहे. 'आषाढास्ये प्रथम दिवसे' गझलेचा मेघदूत देव दरबारात इहलोकीचा वृत्तांत सादर करण्यास कायमचा निघून गेला. दिनांक ११ जुलै २०२१ च्या पावणे दोनच्या सुमारास सुमारे चाळीस वर्षाचा आनंदयात्री म्हणून केलेला गझलप्रवास थांबला. नानिवडेकरांच्या अशा अचानकपणे निघून जाण्याने साहित्य विश्वात कधीही न भरून निघणारी खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनंताच्या प्रवासाला निघालेल्या नानिवडेकरांच्या काही जुन्या कवितेतील ओळी -
झाडामधला काजवा
गावी सूर्याच्या निघाला आणि आभाळाच्या घरी सुन्न काळोख दाटला
देतेस कशाला आता
मागील जुने संदर्भ
सरणावर जळतो आहे
स्मरणांचा हिरवा दर्भ
..............................
निशा संजय डांगे(नायगांवकर)
पुसद
8329065797
छान लेख
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Deleteखूप छान लेख..नानिवडेकर हे माझे mentor होते.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद सर
Deleteअप्रतिम.. आदरणीय नानिवडेकर सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवणारा अभ्यासपूर्ण लेख.खूप आवडला... शब्दांनी सरांना डोळ्यापुढे तुम्ही उभे केलेत त्याबद्दल आभार
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद सर सुरेख प्रतिक्रिया
Deleteमित्र मार्गदर्शक गुरु हे सगळं काही होते ते माझ्यासाठी
ReplyDeleteमाझा पहिला गझल संग्रह प्रकाशित करताना त्या सोहळ्यात ते अध्यक्ष होते...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद गझलकार सीमोल्लंघन
ReplyDeleteखूप सुंदर 👌👌
ReplyDelete