तीन गझला : कैलास गांधी

१.

छान पायांना नवा चाळा मिळाला 
फार नाही पण तिचा पत्ता मिळाला 

गीतकाराचा कसा चेहरा उजळला?
काय गाण्याला नवा मुखडा मिळाला?

सोडली सिगरेट समजुत काढली पण 
आज पाकीटामधे गुटखा मिळाला 

हरवली होती घरातिल मात्र जागा 
एक जमिनीचा जरुर तुकडा मिळाला 

जन्मत: होताच तो माणूसघाणा 
हे बरे शेजारही तुसडा मिळाला 

संपला सहवास हळव्या पावलांचा 
फक्त वाटेला नवा रस्ता मिळाला 

दिवस वर्दीतील आता खूष होता 
वाढली ऐपत तसा हप्ता मिळाला 

सर्व शहराचे शटर डाऊन होते 
एक वाणी त्यातही उघडा मिळाला 

एक गावातिल म्हणे मुलगी हरवली 
आणि मग डोहामधे मुलगा मिळाला 

नजर आईची कधी होती हरवली
काल वडिलांचा जिथे चष्मा मिळाला 

खास नव्हते काही माळ्यावर परंतु 
का स्मृतींचा आज पेटारा मिळाला?

२.

कोण जवळचे हे जग सोडुन गेले आहे ?
या झाडाने केशवपन का केले आहे ?

कधिच चेहरा पाडुन बसली आहे दुनिया 
अन विश्वाचे तोंड किती रडवेले आहे 

जो तो शोधत आहे कशास फक्त निखारा ?
काय चुलीवर रिकामेच पातेले आहे ?

ज्या चिंतांची समजुत घालत होती दुनिया 
त्या चिंतांनी दुनियेला वश केले आहे 

कधी वाटते बदला घेते आहे नियती 
कधी वाटते कुठेतरी चुकलेले आहे 

येणारा क्षण मुद्दल देखिल मागू शकतो 
गडबडीत तर निव्वळ व्याजच नेले आहे 

हीच कल्पना सतत दिलासा देते त्याला 
सगळे खापर दुसऱ्यावर फुटलेले आहे 

कुठलाही क्षण पुर्ण संहिता बदलू शकतो 
किती अनिश्चित हे नाटक रचलेले आहे 

तेच सर्व का आजच वरती येते आहे ?
कधी वाटले होते जे पचलेले आहे 

जिवंत असल्याचा तर एक पुरावा नाही 
तरी खातरी नाही की जग मेले आहे 

काय बनवतो आहे, जे आहे अविनाशी?
काय बनवले होते जे टिकलेले आहे ? 

पुर्ण उत्खनन अजूनही झालेले नाही 
बरेच काही अजूनही पुरलेले आहे 

फक्त कथानक तुझ्याजवळ घडलेले नाही 
एक पात्र पण तुझ्यावरुन रचलेले आहे 

कधी यातले नाट्य जवळचे वाटत गेले 
समज तुला की, .. तुलाच हे सुचलेले आहे ! 

३.

लाख शक्यता प्रचंड आशावादी होत्या 
परंतु त्याही फार तणावाखाली होत्या 

ठोस शाश्वती कुठे कुणाची उरली होती 
सर्व व्यवस्था होत्या पण, पर्यायी होत्या
 
सर्व आकडे कुठे लपवण्यासाठी होते ?
काही संख्या चक्क दिखाव्यासाठी होत्या 

अनेक वर्षे निरोप सुद्धा आला नाही 
आज बातम्या त्यांच्या गावोगावी होत्या 

काही फक्त मिथकांवर अवलंबून होते 
उरलेल्यांच्या आशा देवावरती होत्या 

मृत्युचे भय याच भितीने पळून जाईल 
इतक्या चिंता आज उपाशीपोटी होत्या
 
ही दुनियेची एकमात्र हतबलता नाही 
या आधीही अशाच काही नोंदी होत्या
 
प्रगल्भ त्यांना दुनियेनेच बनवले आहे 
कुठे समस्या जन्मताच मुत्सद्दी होत्या ?

कुणीच का काळाची बाजू मांडत नाही ?
एकजात का एकतर्फी तक्रारी होत्या ?

No comments:

Post a Comment