'दीवान - ए - प्रशांत' च्या निमित्ताने : श्रीकृष्ण राऊत



संग्रह प्रकाशित करताना
गझलांचा क्रम कसा लावावा. हा प्रश्न कवी पुढे नेहमी असतो.
त्याच्या मराठीत प्रचलित पद्धती अशा-
१. 
गझलांचे लेखन जसे झाले असेल त्या तारखेनुसार क्रम लावणे. विंदा करंदीकरांच्या प्रत्येक संग्रहात कवितांचा आणि 'जातक ' मध्ये गझलांचा असा क्रम आढळतो. त्यात स्थळांचाही उल्लेख आहे.
२.
कवीने वाचक म्हणून आपल्या आवडीनुसार क्रम लावणे. ज्या गझलेतून संग्रहाचे शीर्षक घेतले आहे.ती गझल पहिल्या क्रमांकावर घेणे. उदा. सुरेश भट यांचा 'रूप गंधा '/'एल्गार '
३.
मतल्यातील पहिल्या ओळीच्या आद्य अक्षरानुसार देवनागरी वर्णमालेनुसार अकार विल्हे ( Alphabetically)
गझलांचा क्रम लावणे.
'कारूण्य माणसाला संतत्व दान देते ' (२०१९) तसेच 'गुलाल आणि इतर गझला ' ( दुसरी आवृत्ती २०२० )
ह्या माझ्या दोन्ही गझलसंग्रहात मी असा अनुक्रम लावला आहे.
माझ्या माहिती प्रमाणे मराठीत हा प्रयोग पहिलाच असावा.

४.
दीवान - ए - प्रशांत मध्ये उर्दू परंपरेप्रमाणे रदीफच्या शेवटच्या अक्षरानुसार गझलांचा क्रम लावला आहे. 
गझलमध्ये मतल्याची पहिली ओळ रदीफने संपते. रदीफच्या शेवटी आलेले अक्षर लक्षात घेऊन देवनागरी लिपीतील वर्णमाले प्रमाणे गझलांचा हा अनुक्रम आहे.

वरील क्र. ३ मध्ये मी पहिल्या ओळीतील आद्य अक्षराला आधार मानले आहे तर क्र. ४ मध्ये प्रशांत पोरे यांनी
पहिल्या ओळीतील अंत्य अक्षराला आधार मानले आहे. हा एक फरक. आणि दुसरा फरक म्हणजे उर्दू परंपरेप्रमाणे प्रत्येक वर्णाने संपणारी एक तरी गझल असलीच पाहिजे. या करिता
 'क्ष' 'ज्ञ' ह्या सारख्या अंत्य अक्षराने संपणारे रदीफ असणाऱ्या गझला दीवान मुकम्मल करण्यासाठी रचल्या आहेत. तर मी लिहिलेल्या उपलब्ध गझलांचा केवळ क्रम निश्चित केला आहे. क्रमाच्या परिपूर्तीकरिता गझला रचून संग्रहात घेतल्या नाहीत.

इथे उद्देश तुलना करण्याचा नाही तर गझलकारांच्या येणाऱ्या  पिढीला अनुक्रम ठरविण्याच्या पद्धतींचे स्वरूप अधिक स्पष्ट व्हावे, याकरिता ही मांडणी तपशीलवार केली आहे.

वाचकांच्या- अभ्यासकांच्या दृष्टीने  अशा विशिष्ट अनुक्रमामुळे गझलसंग्रहाच्या गुणवत्तेत  काहीही फरक पडत नाही. त्याला कोणत्याही पृष्ठावरचा कोणताही शेर भिडू शकतो. त्याच्या स्मरणात पक्का राहू शकतो. तो वाचकांच्या पसंतीचा खरा क्रम.

दीवान - ए - प्रशांत ' हा गझलसंग्रह
उर्दू मध्ये ज्याला मुरव्वज दीवान म्हणतात तसा आहे. मुरव्वज म्हणजे प्रचलित. पारंपरिक.
उर्दूमध्ये रदीफच्या शेवटच्या अक्षरानुसार 
संग्रहातील गझलांचा  अनुक्रम लावण्याच्या रूढ चलनाला मुरव्वज म्हटले जाते. 'मुकम्मल ' या शब्दाऐवजी 'मुरव्वज ' हा शब्द अधिक नेमका, अगदी चपखल आहे.
कोलंबिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ग़ालिबच्या दीवानला मुरव्वज हेच विशेषण लावलेले आढळते.

'दीवान-ए -प्रशांत ' मध्ये गझलांचा क्रम लावताना उर्दू परंपरेप्रमाणे केवळ क, ख,ग, घ... अशा रदीफच्या अंत्य अक्षरांचे गट पाडून क्रम लावला आहे.
रदीफच्या प्रत्येक गटात
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ,ओ,औ, अं अशा स्वरांनी युक्त अक्षरे त्याच क्रमाने अकार विल्हे आली असती तर खऱ्या अर्थाने हा दीवान देवनागरी आधाराने मराठीकरण करीत परिपूर्ण  झाला असता. दुसऱ्या आवृत्तीत ह्या सूचनेचा उपयोग प्रशांत पोरेंना निश्चित होईल असे वाटते.

'दीवान - ए - प्रशांत' हा गझलसंग्रह.
कोविड- लॉकडाऊनच्या काळात आईवडिलांच्या हस्ते १५ एप्रिल २०२१ ला
प्रशांतने घरगुती साध्या समारंभात प्रकाशित केला.
तसा त्याचा हा दुसरा गझलसंग्रह आहे. या आधी २०१७ मध्ये त्याचा 'गझलप्रिया' हा गझलसंग्रह सुरेश भट गझल मंचचे अध्यक्ष शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि संगीतकार स्व. रवी दाते यांचे हस्ते प्रकाशित झाला होता.
२०१५ साली दै. सामनाच्या 'फुलोरा ' पुरवणीत मी वर्षभर नवोदितांच्या शेरांवर भाष्य करणारे 'गझलाई ' सदर लिहीत होतो. प्रशांत पोरे यांच्या शेरांवर त्यात एक लेख मी लिहिला होता. 'भगवंत मनगटाचा मजला प्रसन्न व्हावा ' ह्या शीर्षकाचा तो लेख पोरेंनी प्रस्तावना म्हणून 'गझलप्रिया' मध्ये समाविष्ट केला होता. ह्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या लेखाची आठवण  झाली.
पोरेंचा पहिला कवितासंग्रह 'प्रिया ' २०१० मध्ये स्व. मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता.
म्हणजे २०१०ते २०२१ या दशकभरात
त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली. त्यातले दोन गझलसंग्रह आहेत.

'दीवान- ए-प्रशांत ' मध्ये आपल्या मनोगतात पोरेंनी गझलसंग्रहाचे 'अर्थशास्त्र' सांगितले आहे. तेही चिंतनीय आहे -

'कवितांचे, गझलेचे संग्रह काढणं हे आज केवढं खर्चिक काम झालंय ही आपली हौस आपल्या वहीत आहे तोवर ठीक आहे. संग्रह काढून तिचं लोकार्पण करणं म्हणजे 'ऋण काढून सण साजरा करण्यासारखं'च आहे. लौकिकार्थानं आणि साहित्यिकदृष्ट्या जरी कवी समृद्ध होत असला तरीही, संग्रह काढून तो बव्हंशी ‘सप्रेम भेट’ ह्या गोंडस नावाखाली फुकटच वाटला जातो. यात कवीचं खरंतर आर्थिक नुकसानच होत असतं. खूप कमी लोक कवितासंग्रह विकत घेताना दिसतात. बाकीचे 'फुकट मिळाला तर वाचू' ह्या आशेवर असतात आणि कवीला अजून आर्थिक संकटात आणतात. '

ह्या सबंध पार्श्वभूमीवर 
दीवान सिद्ध करण्यासाठी प्रशांत पोरेंनी घेतलेली मेहनत मात्र दाद देण्यासारखी आहे.

ह्या संग्रहाला डॉ. संदीप गुप्ते, प्रमोद खराडे यांच्या प्रस्तावना आहेत. तर संग्रहाची पाठराखण करताना डॉ. राम पंडित लिहितात -
'दीवान करणे या क्रियेत गजलकाराची शब्दांवर, छंदावर, यमकांवर अनन्यसाधारण हुकूमत असणे अत्यावश्यक आहे. दीवानचे मूल्य वाङ्मयीनपेक्षा ऐतिहासिक जास्त आहे. '
अर्थात मराठी गझलेच्या इतिहासाला 'दीवान ए प्रशांत ' ची नोंद घ्यावीच लागेल !
त्यासाठी प्रशांत पोरेंचे मनःपूर्वक अभिनंदन !
.
● प्रशांत गजानन पोरे
9689909199

2 comments: