दोन गझला : सौ.अंजली आ. मराठे




१.

जगली किती झेलून शब्दांचे विषारी  घाव 'ती'
टाकायला शिकली पुन्हा आता नव्याने डाव 'ती'

चाणाक्ष नजरेला तिच्या कळले मनाचे सांगणे
तो-यात उडवुन मान पण खाऊन गेली भाव 'ती'

वादात सा-या जिंकले पण हारले नात्यात मी
का टाळली नाही जरा मी, 'मी' पणाची हाव 'ती'? 

आयुष्य सारे वेचले कर्तेपणाने आजवर
जोडेल का नावापुढे त्याचे तरीही नाव 'ती'? 

शिकली सवरली लेकही शहरात राहूनी किती
ज्याने दिला विश्वास तो नाही विसरली गाव 'ती'

२. 

हट्ट वेडा सोड आता
बोल थोडे गोड आता

दे झुगारुन बंधनांना
तू नियम पण मोड आता

आसवे घेऊन गेली
पावसाची झोड आता

फार झाले मौन मित्रा 
आळ सारे खोड आता

भार त्यांचा सोसवेना
रुक्ष नाती तोड आता

दाखवी सारेच उलटे
आरशाला फोड आता

झाकते अब्रूसही ती
एक चिंधी जोड आता 
...............................
सौ. अंजली आशुतोष मराठे, 
बडोदे, गुजरात 

6 comments:

  1. गझलकार सीमोल्लंघन २०२१ मध्ये समाविष्ट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर🙏

    ReplyDelete
  2. तीनही गझल सुंदर आहेस.
    अभिनंदन अंजली ताई

    काव्या मंगेश शिरभाते

    ReplyDelete
  3. तिन्ही गझल खूप सुंदर आहेत, अंजली

    ReplyDelete
  4. तिन्ही गझल अप्रतिम आहेत अंजू ताई
    अभिनंदन

    ReplyDelete
  5. अंजूताई.. अतिशय सुंदर गझल तीनही

    ReplyDelete