चित्र : विशाल इंगोले |
प्रिय गझल रसिकांनो नमस्कार!
‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ चे हे तेरावे वर्ष. अनेक दिग्गज गझलकार आणि आश्वासक नवगझलकारांच्या गझलांसह नव्या वाटेवर मार्गक्रमण करणारा हा विशेषांक आहे. म्हणूनच जगभरातील मराठी गझल रसिकांना हा अंक वैविध्यपूर्ण आनंदानुभूती देण्यास सक्षम ठरेल अशी आशा आहे.
आपल्या समोर हा अंक ठेवतांना आनंद आणि दु:खाची संमिश्र अनुभूती व्यक्तीशः आम्हाला होते आहे. आनंद याचा की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यवर, नवोदित गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. गझला पाठवल्या. त्यापैकी निवडक गझलांना या अंकात समविष्ट केले आहे. आणि दु:ख याचे की, याच अंकात तीन श्रद्धांजलीपर लेख समाविष्ट करावे लागले.
कोणतीही आपदा हा जगणाऱ्या जीवांसाठी परीक्षाकाळ असतो. पास झाला तो तरतो आणि तोच तारतोही. आपदा जशी विनाश घडवते तशीच जगण्याच्या नव्या वाटाही सुचवित असते. गेल्या दीड वर्षापासून कोवीडने सर्वांना घरात बसविले. प्रत्यक्ष भेटी जवळजवळ बंद केल्या. परिणामतः टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, पुस्तके जवळची वाटायला लागली. Whatsapp, फेसबुक मित्र झालेत. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता सुप्तावस्थेत गेलेल्या साहित्यिकांची पिढी सामाजिक प्रसार माध्यमांवर अचानक सक्रिय झाली. अनेक मान्यवर कवी, गझलकारांनी आभासी व्यासपीठावरून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या. काहींनी मुशायरे आयोजित केले. नवोदितांना लिखाणासाठी / सादरीकरणासाठी प्रेरित केले. आणि जादू झाली. गझलेसारख्या तंत्रशुद्ध काव्यप्रकाराकडे नवी पिढी आकृष्ट झाली. ती प्रयत्नपूर्वक लिहू लागली आहे. चांगले लिहिते आहे. याचा मनस्वी आनंद होतो आहे.
गझल ही तंत्रानुगामी गेय विधा. गझलेचे शास्त्र सांभाळून, मोजक्या पण चपखल शब्दांत व्यक्त होणे आणखीनच कठीण. उत्तम काव्यप्रतिभा असणाऱ्या कवीला गझलेचे यामुळेच आकर्षण. मार्गदर्शनाच्या क्षेत्रातही सुरेश भटांनी दिलेल्या बाराखडी व्यतिरिक्त अभ्यास असलेले मार्गदर्शक विरळेच. त्यामुळे चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखीच ही परिस्थिती. आपापल्या समजानुसार प्रत्येकजण मार्गदर्शन करीत असतो.
कोणतेही शास्त्र कधीच परिपूर्ण नसते. त्यामुळे मराठी गझल शास्त्राचेही समीक्षण होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक भाषेचे भाषाशास्त्र, काव्यशास्त्र, उच्चारशास्त्र आणि व्याकरणशास्त्र वेगळे असते. त्यामुळेच भाषेनुसार तंत्रामधेही संशोधन संभवते. हे आपण समजून घेतले पाहिजे. साहित्य कधीही काळाच्या पुढे जात नसते किंवा मागे रहात नसते. ज्या काळात ते लिहिल्या जाते त्याच काळात वाचकांना, समीक्षकांना कळले तरच त्यावर मंथन होते. अन्यथा बाजूला ठेवल्या जाते. अर्थातच कालबाह्य होते. त्याअर्थी साहित्य नेहमीच समकालीन असते. काळजाचा ठाव घेणारे, वैश्विक मूल्याधारित साहित्य लोकभाषेत लिहिल्या गेले असेल तरच ते चिरंतन ठरते. संत लोकभाषेत लिहीत. म्हणूनच संतनिर्मित साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचले. गझलेचेही असेच आहे. तंत्र, लय, आशयघनता आणि गेयता ज्यांनी सांभाळली, त्यांची गझल लोकप्रिय झाली. रसिकांच्या भाषेत, काळजाला हात घालू शकणारी, काव्य जपणारी गझलच गझलेचे भविष्य घडवू शकणार आहे.
मराठी गझल मागे पडते किंवा पुढे जाते म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांना कायम सतावत आला आहे. खरे तर जो ज्या काळात लिहितो तो त्या काळाशी, भाषेशी आणि अभिव्यक्तीशी प्रामाणिक असतो. मग आजच्या कवीच्या काव्याची तुलना ५०-१०० किंवा त्याही पूर्वीच्या कालखंडातील कवीशी, साहित्याशी वा साहित्यिकाशी करून काय साध्य होईल? त्याची निर्मिती त्याच्या कालखंडाशी, रसिकांशी, वाचकांशी तादात्म्य पावते की नाही, हे तपासणे महत्वाचे.
मराठी गझलेला वैभव प्राप्त करून देणारे सुरेश भट जेंव्हा सांगतात की ‘शक्यतो अक्षरगण वृत्तातच गझल लिहावी’ तेंव्हा त्यांचा त्यामागील दृष्टिकोन काय असावा? ते अभ्यासायचे सोडून आम्ही मात्रावृत्ताकडे वळत असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. मात्रावृत्तातील यती न सांभाळलेली गझल लय हरवून बसते. स्वर काफियाचा गझलेतील वापर कवीच्या भावविश्वाला व्यापक व्यासपीठ प्रदान करतो पण त्याच वेळी काव्य आणि लालित्य, जो गझलेचा स्थायीभाव आहे तो हरवतो. स्वरकाफियाच्या गझलेत रदीफ नसेल तर ती गझल गद्यप्राय होते. दीर्घ वेलांटी, उकार ऱ्हस्व करण्याची सवलत कवींना आहे. पण शब्दाचा अर्थ बदलत नसला तरी मात्रापूर्तीसाठी शब्दातील ऱ्हस्वाचे दीर्घ करणे म्हणजे शुद्धलेखनाची वाट लावणे होय ! मात्रा गिराना उर्दू अरूजला म्हणजे उर्दू छंद शास्त्राला मान्य आहे.परंतु मात्रा वाढवणारा इजाफा मंजूर नाही. त्यामुळेच तरक्कीपंसद गझलेच्या नावाखाली केले जाणारे मराठी गझलेतील प्रयोग – जसे फक्त मात्रावृत्त, स्वरकाफिया, गैरमुरद्दफ स्वरकाफिया, ‘अ’कारांत स्वरकाफिया, अशुद्धलेखन असे प्रयोग अल्पायुषी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच कवीने आपल्या प्रवृत्ती आणि प्रकृतीला साजेसे, आनंद देणारे वृत्त निवडून काव्यनिर्मिती केली तर ती अधिक परिणामकारक ठरेल यात शंका नाही.
‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ अंकात जवळपास १३० सहभागी गझलकारांच्या सुमारे ४०० गझलांचा आस्वाद आपण या दीपावली पर्वात घेऊ शकणार आहात. अंकाच्या ‘विशेष’ सदरात गझलकार प्रशांत पोरे यांच्या ‘दिवान ए प्रशांत’ या पहिल्या मराठी गझल दिवानच्या निमित्ताने संग्रहातील गझलांच्या अनुक्रमावर समतोल भाष्य करणारा श्रीकृष्ण राऊत यांचा लेख चिंतनीय आहे. हास्यव्यंगाच्या शालजोडीतून जीवनातल्या विरोधाभासावर मार्मिक वार करणारा प्रकार म्हणजे हझल. कालिदास चवडेकरांच्या सहा हझला आपल्याला विशेष आनंद देऊन जातील. गझलकार तथा हझलकार स्व.धनश्याम धेंडे यांच्यानंतर हझलेचा वारसा कालिदास चवडेकर सक्षमपणे चालवत आहेत.
गझलेतील ‘अंदाजे बयाँ’ तील वेगळेपण सांगणारा संजय गोरडे यांचा अभ्यासपूर्ण लेख, ‘माझी मुलगी’ या गझलेची जन्मकथा सांगणारा किरण डोंगरदिवे यांचा लेख, गीतकार, संगीतकार, गायक आणि हिंदी गझलांच्या चाली कशा तयार झाल्या यांची कथा सांगणारा ‘अफसाना लिख रही हूँ ' हा डॉ. संगीता म्हसकर यांचा लेख, सुप्रसिद्ध गझलकार म. भा. चव्हाणांच्या ‘खुलासा’ या गझलेचे अविनाश चिंचवडकर यांनी केलेले रसग्रहण उत्तम आहे.प्रा.बी.एन. चौधरी यांनी 'उन्हात घर माझे ' या नितीन भट यांच्या गझलसंग्रहाचा परिचय त्यांच्या लेखातून करून दिला आहे. मयूर महाजन यांनी आपल्या लेखात गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उजागर केले आहेत. ह्या सर्व लेखाने प्रस्तुत विशेषांकाला समृद्ध केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात आपण काही गझलकार मित्रांना गमावले. ही बाब निश्चितच दु:खदायी आहे. ‘कुडीच्या कारावासातून सुटका’ हा व्यंकटेश कुळकर्णी यांचा लेख गझलकार इलाही जमादार यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणाची उजळणी करणारा आहे. गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांची गझल सफरीतील मिश्किली सुयोग्य शब्दात निशा डांगे यांनी मांडली आहे. बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबिर सोलापुरी यांनी त्यांच्या श्रद्धांजलीपर लेखातून गझलकार कलीम खान यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे. तिन्ही गझलकारांची ओळख मनमिळावू, नवोदितांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून होती, हे विशेष. गझलेसाठी आयुष्य जाळणाऱ्या तीनही गझलकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डबलिन -कॅलिफोर्निया स्थित प्रियंका सातपुते यांनी काढलेले छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. ग्राफिक्सचा माध्यमाने विनोद देवरकर यांनी त्याला सुरेख केले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
आजपर्यंत प्रकाशित झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
- संपादक
मननीय, वाचनीय असं संपादकीय 👌
ReplyDeleteमराठी गझलेला वैभव प्राप्त करून देणारे सुरेश भट जेंव्हा सांगतात की ‘शक्यतो अक्षरगण वृत्तातच गझल लिहावी’ तेंव्हा त्यांचा त्यामागील दृष्टिकोन काय असावा? ते अभ्यासायचे सोडून आम्ही मात्रावृत्ताकडे वळत असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. मात्रावृत्तातील यती न सांभाळलेली गझल लय हरवून बसते. स्वर काफियाचा गझलेतील वापर कवीच्या भावविश्वाला व्यापक व्यासपीठ प्रदान करतो पण त्याच वेळी काव्य आणि लालित्य, जो गझलेचा स्थायीभाव आहे तो हरवतो. स्वरकाफियाच्या गझलेत रदीफ नसेल तर ती गझल गद्यप्राय होते. दीर्घ वेलांटी, उकार ऱ्हस्व करण्याची सवलत कवींना आहे. पण शब्दाचा अर्थ बदलत नसला तरी मात्रापूर्तीसाठी शब्दातील ऱ्हस्वाचे दीर्घ करणे म्हणजे शुद्धलेखनाची वाट लावणे होय !
ReplyDelete.... अतिशय सुंदर व मार्मिक भाष्य केले आहे ! मनापासून धन्यवाद. उठसूट अक्षरगणवृत्तांपासून पळणे , शुद्धलेखनाची वाट लावणे ही अगतिक सवय आहे. आम्हांला सुरेश भट कळले नाहीत किंवा कळून घ्यायचेच नाहीत, असा हा प्रकार आहे.
मराठी गझल मागे पडते किंवा पुढे जाते म्हणजे नेमके काय? ... खरे तर जो ज्या काळात लिहितो तो त्या काळाशी, भाषेशी आणि अभिव्यक्तीशी प्रामाणिक असतो. ... त्याची निर्मिती त्याच्या कालखंडाशी, रसिकांशी, वाचकांशी तादात्म्य पावते की नाही, हे तपासणे महत्वाचे.
ReplyDeleteकाय झाले/केले हा इतिहास. काय होणार/होईल हा आशावाद. आणि वर्तमानात जगणे म्हणजेच वास्तविक जीवन. कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी/ मिळविण्यासाठी वर्तमान काळात जगणे गरजेचे. आशावाद बियाण्याप्रमाणे असतो. वर्तमानात पेरला गेला तर भविष्यात रुजण्याची शक्यता असते. उत्तम बीजापोटी, फळे रसाळ गोमटी! म्हणून उत्तम ते पेरावे.
मार्गदर्शक संपादकीय!