शायर कलीम खान यांना आठवताना : बदीऊज्जमा बिराजदार



            आर्णीचे माझे आदरणीय मित्र शायर कलीम खान सर आपल्याला सोडून गेले हे अजूनही मन मान्य करायला तयार नाही. कोरोनाच्या या क्रूर काळाने माणसाचे मृत्यू अतिशय स्वस्त करून ठेवले असले तरीही काहींचे मृत्यू खूप अमूल्य, महत्त्वाचे असतात. निर्मितीशील व्यक्तीचं जाणं ही समाजाची मोठी हानी असते. शायर कलीम खान सर तर अखेरच्या श्वासापर्यंत सृजनशील, निर्मितीशील राहिले. त्यांचा हात कायम लिहिता राहिला. कलीम खान हे लेखन वाचना बरोबरच सोशल मीडियावर ही तितकेच सक्रीय होते. इथेच आमची खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली मग पुढे या ओळखीचा सिलसिला विस्तारतच गेला. एकमेकांच्या साहित्यसंपदेचा परिचय देखील झाला. त्यानंतर कविसंमेलन आणि मुशायऱ्यांच्या निमित्तानं आम्ही नेहमी एकत्र येत राहिलो. आमच्यातला स्नेह दिवसागणिक वाढत गेला, किंबहुना बळकट होत गेला. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या कितीतरी आठवणी माझ्या समोर लख्ख झाल्या आहेत.

     कलीम खान यांना मित्रांची चांगली पारख होती. माणुसकी अन् मित्रत्वावर त्यांचा गाढ विश्वास होता. कसदार साहित्य लेखनावर जसा त्यांचा भर होता तसेच मित्रांवर मनःपूत प्रेम करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. त्यांनी मित्रांना कधीच अंतर दिले नाही. एकदा त्यांच्या संपर्कात आलेला मित्र कायमचा त्यांचा होऊन जायचा. इतका आपलेपणा त्यांच्या सहवासात असायचा. तो प्रत्येकालाच लाभायचा. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. सुमारे बारा वर्षापासून आमचे मैत्रीचे संबंध होते अलिबाग येथे पार पडलेल्या गझल मुशायऱ्यातून आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलो. त्यानंतर पुण्यात चर्चासत्र-मुशायर्‍यात आणि पनवेलला मिलाजुला मुशायराचे ते अध्यक्ष होते तर मी मराठी कवी संमेलनाचा अध्यक्ष होतो. शब्द विश्व साहित्य संमेलन बँकॉक येथील मुशायर्‍यातही आम्ही दोघे सहभागी होतो. अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे जळगावात पार पडलेल्या संमेलनात आमचा निमंत्रित सहभाग होता. सोलापूरचे गझलकार मुबारक शेख हे नवोदित कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. कलीम खान जळगावच्या एका हॉटेलवर थांबले आहेत याची माहिती मी मुबारक शेख यांना दिली. आम्ही लगेच दोघे तातडीने, अगतिकतेने त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे पुण्याचे गझलकार मसूद पटेलही उपस्थित होते. आम्हा चौघांची चांगलीच मैफल रंगली होती. कलीम खान यांनी आम्हाला गझला ऐकवण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यांना गझला ऐकवल्या. त्यांनी आम्हाला मनसोक्त दाद दिली. ते माझ्या बाबतीत म्हणाले की, तुमची तरन्नुममधील पेशकारी छानच आहे. तुम्ही वरच्या पट्टीत चांगलं गाता. तुमच्यासारखा हरहुन्नरी शायर उर्दूतही आला पाहिजे असं मला वाटतं. मी पुढेमागे उर्दूतही लिहीन असं सांगून त्यांना आश्वस्त केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कविता ऐकवल्या कलीम खान यांना ऐकताना त्यांच्याशी बोलताना आमच्या वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. मैफलीत मुशायर्‍यात त्यांचं स्वतःचं लक्षवेधी सादरीकरण असायचंच. परंतु ते आपल्या खुसखुशीत सूत्रसंचालनानं  मैफलीत चारचांद लावायचे. याशिवाय कलीम खान चर्चासत्रातून वांग्मयाविषयाची अभ्यासपूर्ण मते मांडत असत. अधिकारवाणीनं भाष्य करत असत. नवोदितांच्या कविता समजून घेत त्यांना हातचं न राखता मार्गदर्शन करणं हाही त्यांचा गुणविशेष होता. अलीकडच्या काळात 'रसिक'मध्ये गझलेच्या गावात हे माझे गझलेचे सदर सुरू झाले आहे. त्यातील त्यांना आवडलेल्या लेखांवर भ्रमणध्वनीवरून प्रतिक्रिया देऊन ते मला प्रोत्साहित करत असत. माझ्या सदराचा त्यांना खूप आनंद झाला होता. तो त्यांनी वेळोवेळी माझ्याकडे व्यक्त केला होता. याचं चांगलं पुस्तक होईल पुस्तक जरूर काढा हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

     त्यांच्या स्वतःच्या गझल लेखनाविषयी त्यांचं असं सांगणं होतं की,


श्रृंगारते यारा कधी अंगारते माझी गझल
बर्फातल्या सूर्यासवे अवतारते माझी गझल

तैसी खरे तर नेहमीही शांततेने नांदते
पण वेळ जर आलीच तर एल्गारते माझी गझल   


          या मनोधारणेनं त्यांचा गझल प्रवास घडत होता. हिंदी मराठी उर्दू इंग्रजी संस्कृत आदी भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.

   हिंदुस्थानाविषयी त्यांना कमालीचा अभिमान होता. इथल्या प्रांतांविषयी, प्रदेशांविषयी  त्यांना आपलेपणा होता. त्यांच्या मनात आदराचे स्थान होते. मराठी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे मन:पूत प्रेम होते. गझल कौमुदी मध्ये त्यांनी लिहिलेली गझल त्यांच्यातील राष्ट्रीय सलोख्याचे प्रतीक होते.

मीच दिल्ली मीच केरळ मीच हिंदुस्तान आहे
मरणही माझे भुईला कुंकूवाचे दान आहे

बाबरी मस्जिद असो वा जन्मभूमी पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे


            'कलीमच्या कविता ', 'कलीम के दोहे ', अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला त्यांचा 'गझल कौमुदी ' हा मराठी गझलेच्या प्रांतात वेगळी वाट चोखाळणारा ठरला. त्याचे वैशिष्ट्य असे की परिशिष्ट (एक) वृत्तशास्त्र परिशिष्ट (दोन) रुबाई याबाबतची परिशिष्टे समाविष्ट केलेली आहेत. गझल आणि रूबाईच्या अभ्यासकांना, समीक्षकांना नव्याने लिहिणाऱ्या गझलकारांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे 'मंजर ' (साझा हिंदी-उर्दू गझलसंग्रह) संपादित करून त्यांनी हिंदी-उर्दू गझलेच्या अनुबंधाच्या अनुषंगाने लेखन केले आहे. 

    जरी त्यांची मातृभाषा मराठी नसली तरी उभ्या जीवनाची कहाणी मराठी असल्याचे ते निक्षून सांगत राहात.

मुखी माझिया गोड वाणी मराठी
मला शोधण्याची निशाणी मराठी

जरी मातृभाषा मराठी न माझी
उभ्या जीवनाची कहाणी मराठी


             मराठी आणि उर्दू गझलेला समृद्ध करणारे कलीम खान यांचे आगामी साहित्य देखील विपुल प्रमाणात आहे. ते प्रकाशित झालं पाहिजे. यासाठी सरकारनं, मराठी साहित्य संस्थांनी, साहित्य मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे. इतकी त्याची वाचनीयता व उपयोगिता आहे.

    कलीम खान हे आर्णी (जिल्हा यवतमाळ) सारख्या छोट्या अन् आडवळणी गावी राहून शेवटपर्यंत साहित्याची मोठ्या निष्ठेने सेवा करत राहिले. त्यांचं साहित्यातलं कर्तृत्व खूप मोठं होतं. ते मुंबई पुण्यासारख्या महानगरीत वास्तव्यास असते तर त्यांच्या वांङ्मयाचे मूल्यमापन योग्य प्रकारे झाले असते. त्याच्या वाट्यास अधिक लोकप्रियता आली असती. परंतु याची त्यांनी कधीच खंत बाळगली नाही. यावर त्यांचं उत्तर तयार होतं. 'गड्या आपुला गाव भला'.

   अलीकडच्या काळात कलीम खान यांची प्रकृती त्यांना साथ द्यायची नाही. परंतु कविसंमेलनाच्या  निमित्तानं  त्यांना गावोगावी जावं लागत असे. अशा वेळी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या पत्नी हमखास त्यांच्या सोबत असायच्या तळहातावरील फोडाप्रमाणे त्या त्यांना जपत असत. माझी आणि त्यांची भेट व्हायची मी त्यांना चाची म्हणत असे. कलीम खान यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानात चाचींचही मोठं योगदान आहे असं म्हटलं तर ते वावगं नाही ठरणार. त्यांच्या आधारानेच तर कलीम खान साहित्य वर्तुळात वावरू शकले. म्हणून चाचीच्या सेवेला तोड नाही. 

.............................................

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)

दैनिक सामना 'उत्सव' पुरवणी / दि. १६ मे २०२१ वरून साभार

 

No comments:

Post a Comment