१.
घ्या ओळखून धोका !
आहे टपून बोका !
अन्याय पाहता अन् ,
म्हणता खुशाल , " हो का ? "
महिना निवडणुकीचा ,
आहे सुरेख मोका !
हे पक्ष काय करिती ? ,
देतात फक्त झोका !
ढोंगी सरावले हे ,
त्यांना धरून ठोका !
सामान्य माणसा रे ,
शोधून ठेव फोका !
' अविनाश ' गोष्ट सांगे ,
ही तळमळून लोका
२.
अशा ह्या जगी मी रमावे कसे हो ?
जिथे फक्त पैसाच प्यारा असे हो !
कुठे ती अयोद्धा , कुठे थोर बंधू ,
इथे मात्र भाऊच भावा डसे हो !
कुणी काय बोले , कुणी काय वागे ,
कशाची कुणा लाजलज्जा नसे हो !
कुणाची न भीती इथे दुर्जनांना ,
मनी सज्जनांच्याच भीती वसे हो !
कसा काळ आला , कळेना कुणाला ,
महामानवांचे जहाले हसे हो !
किती पक्ष आले , किती पक्ष गेले ,
सदा भूलथापास जनता फसे हो !
करावे तरी काय , काही सुचेना ,
अखेरीस 'अविनाश ' ध्याना बसे हो !
३.
सारा समाज हल्ली एकात्म आढळेना !
जातींमधून तोही बाहेर का पडेना ?
स्वातंत्र्य , बंधुता अन् समता अम्हांस प्यारी ,
सारे करून झाले , पण चित्र पालटेना !
जात्यंध धूर्त सारे हल्ले लपून करती ,
साऱ्या सुधारकांची लढते अजून सेना !
आरक्षणास रक्षण द्यावे जरूर आम्ही ,
पण ताळतंत्र त्याचा आम्हां मुळी जमेना !
शिरला समाज जेथे , तो चक्रव्यूह आहे ,
' अविनाश ', भेदुनी ते , बाहेर तूच ये ना !
.......................
*- प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर ,*
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी ,
बालेवाडी फाटा , बाणेर ,
पुणे - ४११०४५
भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२
ई-मेल : sangolekar57@gmail.com
Khupch chan sir
ReplyDeleteJay shree mataji.