तीन गझला : मारोती मानेमोड


संकोच दूर ठेउन,मौनातल्या  तळाशी
देहापल्याड आपण   भेटू परस्परांशी 

नेऊ पुढे न शकलो  वाहून एक इच्छा
माझ्यापुढेच हतबल माझ्यातला खलाशी 

हे विश्व एक आहे निर्वात पोकळीचे
मी कोणत्या दिशेचा आहे खरा प्रवाशी

स्पर्शाविणा तुझ्या ही प्रत्येक रात्र सरते 
प्रत्येक  रात्र  मरते  डोळ्यांपुढे  उपाशी

मी वावटळ युगाला जन्मास घालणारी
माझे कधी न कुठल्या जमणार वादळाशी

ओढून  रोज  नेते  मरणाजवळ  निराशा
मी  वेगळी  कशाला  देऊ  स्वतःस फाशी

भोगून पानगळ मी,वर्तूळ पूर्ण करतो
माझे जुनेच नाते माझ्या जुन्या कुळाशी
              
२.

वेदनेचा तुझ्या शृंगार भोगला..
मी तुझ्या आतला आकार भोगला

मी दिव्याखालच्या जागेत राहिलो 
जन्मभर फक्त मी अंधार भोगला

जीव तर एकदा मी लावला तुला 
मीच नंतर खरा आजार भोगला

उमलत्या मारुनी गर्भातल्या कळ्या 
तू फुलांचा किती व्यापार भोगला

काळ घेईल माझी नोंद या पुढे
मी व्यथेचा कसा दरबार भोगला

चढवली दाखल्यावर जात एकदा 
मग पुढे जातीतला अंगार भोगला

बंदिवासात  का  टाकून  मोगरे
तू सुगंधी पुढे सत्कार भोगला

भोगली  जिंदगी  मी  वेगळी  कुठे 
फक्त  वाटयातला  संसार  भोगला

३.

डोहात कुणी एकांती  बुडवायचे  मला
एकदा तरी काचेसम  तडकायचे मला

याचमुळे मी दार   घराचे बंद ठेवले
कधीच नव्हते पुन्हा घरी परतायचे मला

सुरकुतलेल्या चेह-यावरच्या आदिम रेषा
कुण्या युगांच्या गोष्टींना सुचवायचे मला

मौनावरची कात  उदासी  टाकायाची
अन क्षितिजावर कुणीतरी खुणवायचे मला

इंद्रधनूच्या पल्याडचे तू ओठ  मला  दे
रंगामध्ये गूढ अशा   रंगायचे मला

फुलणा-यांचे मला फारसे कौतुक नाही
पानासोबत गळणा-या  बोलायचे मला

नको त्याच मी रस्त्यावरती चालत आहे
नको तेथल्या मुक्कामावर जायचे मला
.

No comments:

Post a Comment