तीन गझला : सुरेश सायत्री किसन धनवे


१.

नेमका माझाच मजला त्रास वाटू लागला
चार भिंतीतच मला वनवास वाटू लागला

जीव ज्यांना लावुनी मी जीव माझा जाळला
आज त्यांना का नको सहवास वाटू लागला

हात हाती घेवुनी मी चाललो ज्यांच्यासवे
आज मजला हात तो गळफास वाटू लागला

एक होता काळ,अमुचा बाप पुजला जायचा
तोच हल्ली लेकरांना दास वाटू लागला

पाहती आजी अजोबा पुस्तकातच नातवे
हा मला अपुलेपणाचा ऱ्हास वाटू लागला

लाभला पैसा तरीही सौख्य नाही लाभले
तो गरीबितला जिव्हाळा खास वाटू लागला

हे खरे की मीच धरले मृत्युला रोखूनही
पण अता सोडून द्यावा श्वास वाटू लागला

२.

मुलगी माझ्या पोटी आली
दुःखाला ओहोटी आली

घरात नव्हती चटणी भाकर
ताटात तूप रोटी आली

मी घटना ती खरी पाहिली
वार्ता छापुन खोटी आली

मृगजळाच्या मागे धावलो
हाती बघ लंगोटी आली

हिरा समजून विकत घेतला
पदरात गारगोटी आली

३.

अमुचा समाज नेता जर काय नेक असता
सारा समाज त्यांच्या पाठीस एक असता

झाले कधीच नसते निर्माण वृध्द आश्रम
माता पित्यास जर का दिलदार लेक असता

नसतीस तू दिसाया इतकी सुरेख सखये
हमखास संयमाचा सुटलाच ब्रेक असता

आलेच गुंड नसते निवडून लोकशाहित
थोडा जरी जनाचा सावध विवेक असता

बोलाविले मला तू असतेच वाढदिवशी
हृदयात ठेवला मी कोरून केक असता

No comments:

Post a Comment