१.
कधी तारा,कधी बेभान वारा व्हायचे मी पण
जरी कक्षेमधे होते तरी भटकायचे मी पण
"जरा आलोच' हे सांगून तू गेलास केंव्हाचा
कळेना रे इथे थांबायचे की जायचे मी पण
तुझी आहेच मी केवळ असे मानून घेऊ की
पुरा आहेस तू माझा असे समजायचे मी पण
दिले होते,तरी देतोस तू ,देशीलही नंतर
तरी ठरवू किती म्हणजे किती मागायचे मी पण
विसरणे शक्य नाही पण तुला जर शक्य झाले तर
मलाही सांग ना सारे कसे विसरायचे मी पण
२.
सुख दुःखाचे थर सांभाळू
तुझे नि माझे घर सांभाळू
कधीतरी बिलगून बघूया
कधीतरी अंतर सांभाळू
एक शक्यता अशक्य आहे
त्यासाठी जर-तर सांभाळू
उधळुन टाकू जे जमेल ते
उरलेले नंतर सांभाळू
हा परतीचा पाउस आहे
चल एखादी सर सांभाळू
ठेव मलाही जपून आता
मीच तुला कुठवर सांभाळू
३.
व्यथांना मिळाले अभय सांगते
तिची नेहमीची सवय सांगते
तुझ्याभोवती मीच आहे जणू
तुझ्या भोवतीचे वलय सांगते
त्सुनामी स्वतःलाच समजून मी
तुझे नाव आता प्रलय सांगते
फुलांना जरासे विचारुन बघू
बघूया किती कोण वय सांगते
तुझे कारणाविन बिलगणे मला
तुझ्या काळजातील भय सांगते.
No comments:
Post a Comment