तीन गझला : संकेत रायपुरे


१.

एवढ्या वेगात वारा आपल्याला सांग परवडणार आहे का?
त्यात हा जळता निखारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

जिंदगी कुर्बान केली मी तरी येणार नाही तेवढी किंमत
एवढा श्रीमंत तारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

मान्य आहे की उगाचच गोड बोलुन निभवता येतेच सगळे पण
सत्यतेचा कोंडमारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

केवढ्या झाल्यात उलथापालथी, झालेय अस्ताव्यस्त जीवनही 
हा नको तितका पसारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

पूर्ण जग एकीकडे,तू आणि मी दुसरीकडे झालोत आता तर
फक्त शब्दांचा सहारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

वर्तमानाच्या समुद्रातील लाटा क्रूरतेने थकवतिलही पण
भूतकाळाचा किनारा आपल्याला सांग परवडणार आहे का?

२.

आपलेच दुःख रोज आठवायचे
अन मुकेशचे विषण्ण गीत गायचे

झोप यायची मला कधीतरी इथे
आणि फार छान स्वप्नही पडायचे

अंगणातल्या विशाल पिंपळावरी
रोज एक शांत पाखरू बसायचे

रात्र संपली तुझ्याच आठवांमधे
आणखीन मी तुला किती स्मरायचे?

हो तुझाच धर्म ज्यात जात जन्मली
त्यास का उगाच चांगले म्हणायचे?

३.

कुणीतरी इतकेच काळजीपोटी सांगितले आहे
''दार उघडण्याआधी बघ दारात कोण आले आहे''

वारा नसतानाही का झाडाची पाने थरथरली?
त्यावर नक्की भूत कुणाचे घाबरून बसले आहे?

सोबत होतिस तेव्हा तर मी अवघडायचो कधीकधी
आज पूर्ण आयुष्य तुझ्या जाण्याने अवघडले आहे

प्रस्थापित नजरेने तू संपूर्ण जगाला बघतो,हे
तुझ्या बोलण्यातूनच आता स्पष्ट स्पष्ट दिसले आहे

समोरच्या चौकात उभा माझ्या 'बा भीमाचा' पुतळा 
त्या पुतळ्याने कितीतरी लोकांस मुक्त केले आहे


No comments:

Post a Comment