तीन गझला : विशाल राजगुरू

 

१.

मी रक्ताचे पाणी करतो आहे
रोज नव्या आशेवर जगतो आहे

घाम गाळतो आहे आनंदाने
जमीन माझी सुपीक करतो आहे

जातो आहे दोन पावले मागे
झेप घ्यायला वाट बनवतो आहे

कठोर मी बनवून स्वतःला माझी
इच्छा केविलवाणी करतो आहे

बाप मुलीचा असेल त्याच्यामध्ये
किती पहा फोडाला जपतो आहे

सुरात नाही तर मग काहीही म्हण
गातो आहे किंवा म्हणतो आहे

समुद्रापरी जीवन जगणारा मी
भरती ओहोटी अनुभवतो आहे

२.

 कुठे जायचे नक्की समजत नाही
खडा लागला त्यावर पायालाही

शवयात्रेला बघून कळले नाही
कोण इथे कोणाचे ओझे वाही

फक्त फुलाच्या गोष्टी केल्या थोड्या
आणि टोचला काटा काट्यालाही

स्वप्नांनाही कळून चुकले आहे
त्यांची दुनिया माझी दुनिया नाही

सहवासाची सवय लागली आहे
जीव तुझ्या जाण्याने जाऊ पाही

३.

आपल्या दोघांमधे तिसरा कुणी आला
काय मग होणार होते, सोहळा झाला

लावली तोंडास अवघी बाटली त्याने
आणि मग कायम रिकामा राहिला प्याला

संशयाला खोलवर रुजवून लोकांनी
घातला विद्रूप दृष्टिकोन जन्माला

नाव पुटपुटले तुझे हळुवार ओठांनी
आणि हाहाकार नुसता माजला साला

साजरा केला असा गोपाळकाला की
शेवटी झलाच गोपाळा तुझा काला

लोक तर घटनास्थळी आधीच जमलेले
वेळ थोडा लागला पोलीसवाल्याला

1 comment: