१.
आज आला नेहमी येऊ नये
सारखा माझ्यात 'मी' येऊ नये
वेल काटेरी मनाची आपल्या
फूल त्यावर रेशमी येऊ नये
प्रेम वाढत चालले माझे तुझे
त्यामधे आता कमी येऊ नये
राहिला दुष्काळ ते चालेलही
पण उमाळा मौसमी येऊ नये
सारखी भीती मनाला वाटते
की नकोशी बातमी येऊ नये
ऐतखाऊ व्हायचा हा जीव मग
एवढीही बेगमी येऊ नये
बोलतो आहे तुझाही चेहरा
आज मैफिलीत मी येऊ नये
२.
त्रास देणाऱ्या व्यथेला काळजापाशी धरू
आज दृष्टीने जगाच्या आणखी वेडे ठरू
एक जो पाऊस आहे अंतरी माझ्या तुझ्या
शीग प्रेमाची कधीही देत नाही ओसरू
वेदना,दुःखे स्वतःची सांगते माझ्याकडे
काळजाच्या वळचणीला रोज येते पाखरू
भावनांची खूप दाटी ह्या तुझ्या डोळ्यांमधे
मन जणू जत्रेमधे त्या हरवलेले लेकरू
घालतो पिंगा सभोती रानवारा सारखा
केस मी मागे करू की,पदर माझा आवरू
चांगले असते असेही वाहवत जाणे कधी
तोल जर गेलाच आहे तर कशाला सावरू
रेखले आहे तुला मी आपल्या डोळ्यांमधे
मग कशासाठी उगाचच वेगळे काजळ भरू
.......................
बढिया 👌👌👌
ReplyDelete