तीन गझला : बदीऊज्जमा बिराजदार


१.

पत्तेच प्राक्तनाचे थोडे अजून पिसतो!
हातात डाव येतो का? तेच आज बघतो!

येतात रोज स्वप्ने पण, पाहुण्याप्रमाणे;
मी सत्य सोबतीला घेवून आज जगतो!

चाहूल येत नाही केव्हाच वादळाची
येतील ती कधीही माझ्या मनास म्हणतो!

डोळे भरून आले पाहून दु:ख त्याचे;
क्षणभर तरी स्वत:ची दु:खे, सुखे विसरतो!

हृदयी अजून ताज्या कित्तेक खोल जखमा;
दु:खे निहाळताना मी एकटाच हसतो!

स्वर्गीय सौख्य आहे तुझिया सभोवताली;
पण जीव मात्र 'साबिर ' कोठे अजून रमतो?

२.

मोजक्या या भाक-या,व्याकूळ असणारे किती?
ही नदी प्यासी स्वत: तर, प्यास गिळणारे किती?

संप, मोर्चा आणि धरणे, मार्ग सारे जाहले;
घोषणा झाल्यात नुसत्या, मात्र मिळणारे किती?

चोचले अन् आवडीनिवडी किती करतात ते?
भाकरीसाठी अहोरात्रीस झुरणारे किती?

आपल्यासाठीच झिजणारे किती दिसती इथे
या जगासाठीच केवळ सांग, जळणारे किती? 

फक्त नावाचा तराजू,तोच काटा मारतो!
न्याय मागावा कुणाला? न्याय कळणारे किती?

झिंगलेल्या माणसांना लाजलज्जा कोठली?
पाहते जग सर्व 'साबिर' पण, समजणारे किती?

३.

शिस्त घटनेच्या हिताची मस्त आहे
कायद्यावर माफियाची गस्त आहे

राज्यकर्ते अन् विरोधी पक्षनेते
देश हा त्यांच्यामुळे उध्वस्त आहे

न्यायदेवीचा तराजू पाहिला का?
पारड्यांच्याही तळाशी जस्त आहे

घोषणांवर घोषणा करतात नेते
घोषणांनी मायभूमी त्रस्त आहे

काय विद्युतदाहिनीचा अर्थ 'साबिर '?
माणसांचा जवळ आला अस्त आहे!
........................
बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी )

6 comments: