तीन गझला : विशाल बोरकर


१.

वावराला राहिली ना पेरण्याची शक्यता
राहिल्या कोठे चुली ह्या पेटण्याची शक्यता 

काळही निष्ठूर झाला माणसाच्या ह्या परी
शक्य ना अवशेष काही राहण्याची शक्यता 

देश हा विकण्या निघाले हे पुढारी येथले
राहिली ना कायद्याला पाळण्याची शक्यता

वैभवाला पाहुनी मित्रास जळतो मित्रही
हा अता आजार आहे वाढण्याची शक्यता

शोषले मी सर्वही ते प्राक्तनी जे भेटले
जीवनाला राहिली ना साहण्याची शक्यता

मंगळाला भेटुनी आला जरी तू भूवरी
पण इथे माणूस नाही भेटण्याची शक्यता

थांब थोडे बोलतांना वावगे बोलू नको
शब्द हे असती मुके पण टोचण्याची शक्यता

२.

रोज अश्रूमधे नाहते जिंदगी
मग कशी कोरडी राहते जिंदगी 

अंतरीची सुखे त्यागते सर्वही
दुःख माझे तरी साहते जिंदगी 

हरवलो मी कधी आत माझ्यामधे
वाट माझी तरी पाहते जिंदगी 

रोज छळतो तिला ,दोष देतो तिला
भार माझा तरी वाहते जिंदगी 

मी तिच्यावर कसा आळ घेऊ अता
जी मला अंतरी चाहते जिंदगी

३.

प्राक्तनाचा कोणता हा बेत आहे
दैव कोठे माणसाला नेत आहे

संपतो का प्राणवायू माणसाचा
काळ मोठा श्वास आता घेत आहे

नवस केले पोरगा जन्मास आला
आग या बापास कोणी देत आहे

संपणाऱ्या ह्या दिसाची सोड चिंता
तो उद्याचा सूर्य येथे येत आहे

No comments:

Post a Comment