१.
हे नशेचे रिक्त प्याले एकतर्फी
का करावे प्रेम झाले एकतर्फी
लग्न केले का तिने राजीखुशीने
देत होती बस हवाले एकतर्फी
एकटीने सोसल्या सगळ्या कळा त्या
वेदनेला घर मिळाले एकतर्फी
सासरी ती चालली होती मजेने
प्रेत माझेही निघाले एकतर्फी
पावसाची गस्त होती रात्रभर अन्
विस्तवाने घर जळाले एकतर्फी
जन्मभर मारून इच्छा झोपला तो
प्रेम बापाचे निघाले एकतर्फी
प्रेम पत्राने दिला होता इशारा
जीव गेल्याचे कळाले एकतर्फी
कर्ज मी फेडू न शकलो शेतकीचे
पीक गेले व्याज आले एकतर्फी
आज माझा एक नाही या ठिकाणी
काल सारे गाव झाले एकतर्फी
२.
जगतो आहे आशेवर मी
धरला जातो धारेवर मी
जीवन म्हणजे सर्कस आहे
कसरत करतो तारेवर मी
चूक बरोबर कळते सारे
असतो माझ्या जागेवर मी
भूत मनाचे उतरत नाही
बसतो माझ्या मानेवर मी
चालत जातो पुढे जगाच्या
काटे पेरत वाटेवर मी
कधी खलाशी कधी किनारा
वाहत असतो लाटेवर मी
३.
लाव माझा भाव बंधू
साध अपुला डाव बंधू
थांबला तो संपतो रे
रोज थोडे धाव बंधू
भेटले ते खूप आहे
का करू मी हाव बंधू
फक्त पैसा जोडतो तू
दे कलेला वाव बंधू
वाटते जर मी करावे
जीव मजवर लाव बंधू
मी प्रवाही धुंद वारा
विश्व माझे गाव बंधू
वेळ आल्यावर बरोबर
रंक होतो राव बंधू
मी स्वतःला शोधले पण
लागला ना ठाव बंधू
होय आहे मी जणांचा
सांगतो मी नाव बंधू
वाह
ReplyDelete