तीन गझला : अनिकेत सोनावणे


१.

जात नाहीत ताप पाण्याचे
मात्र चालूच जाप पाण्याचे

पूर, गारा, तहान अन अश्रू
खूप आहेत शाप पाण्याचे

शेवटी मान टाकली त्याने
कर्ज होते अमाप पाण्याचे

फक्त वरचे कवच टणक असते
आत असतात बाप पाण्याचे

दोन तट दूर राहिले कायम
फक्त झाले मिलाप पाण्याचे

चकचकीवर नका भुलू त्यांच्या
जीव घेतात साप पाण्याचे

पाप धुतलेत फार पाण्याने
कोण पुसणार पाप पाण्याचे

उकळवू मी कसे परत पाणी
ऐकले मी विलाप पाण्याचे

२.

बरीच पक्की बसली होती गाठ मनाची
तुटल्यावर पण सुटली नाही गाठ मनाची

कधी कसे अन कुणामुळे ते कुठे समजले
फक्त समजले पडली होती गाठ मनाची

माझ्यासाठी सुद्धा जागा उरली नाही
झाली आहे इतकी मोठी गाठ मनाची

माणसाळले असते कधीच दुसरे श्वापद
मनात असते मात्र मनाशी गाठ मनाची

पदराला तर गाठ कुणीही बांधू शकते
दम असेल तर बांध मनाशी गाठ मनाची

किती तरंगत राहशील तू वरच्यावरती
एकदा तरी खोल पातळी गाठ मनाची

लाल असो वा असो सावळी रुजून जाते
रंग मृदेचा पाहत नाही गाठ मनाची

रोज कंगवा फिरवत जावा मनावरुनही
सुटून जाते होण्यापूर्वी गाठ मनाची

३.

आकाश जसे काळे होते डोळ्यांचे
चमकतात मग अजून तारे डोळ्यांचे

स्वप्न पाहिले नाही मग त्या डोळ्यांनी
ज्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले डोळ्यांचे

हरवत नाही हरवावेसे वाटुन पण
डोळस होते जुने नकाशे डोळ्यांचे

किती खलाशी बुडून गेले डोळ्यांचे
जहाज बरेच फुटीर असते डोळ्यांचे

पीक उगवले नाही कुठले परत कधी
शिवार खारे झाले आहे डोळ्यांचे

नजर बदलली नाही अजून डोळ्यांची
केवळ नंबर बदलत गेले डोळ्यांचे

नको तेवढी किंमत आली डोळ्यांना
दुकान चालू झाले आहे डोळ्यांचे

कोण कुणाचे प्रतिबिंब हेच समजेना
समोर होते दोन आरसे डोळ्यांचे

नजर लागली रंगबिरंगी गॉगलला
दिसू लागले रंग आतले डोळ्यांचे

ग्रंथ वाचले नाही नंतर कुठलेही
फक्त वाचले नंतर मिसरे डोळ्यांचे
 
............................
 
अनिकेत सोनावणे

No comments:

Post a Comment