दोन गझला : अलका कुलकर्णी

१.

हव्यास वाढता तू नादार होत आहे 
रे माणसा किती तू लाचार होत आहे

आला जसा विषाणू थैमान घालणारा
घ्या औषधे नि काढे भडिमार होत आहे

दु:खास भोगताना व्हावे न पाठमोरे
जगणे पहा सुखाचे आगार होत आहे

तू क्रूर का विधात्या ओढून आप्त नेतो
उध्वस्त पारखे हे घरदार होत आहे

तांडव तुझे निसर्गा, थांबव अता तडाखे
जगणे नकोनकोसे बेजार होत आहे

ओवाळता फुलाने काळीज मोहरावे
मनभावना बिलोरी गुलजार होत आहे

भासात साजणाच्या नि:शब्द स्पर्श भाषा
संवेदना असोशी अलवार होत आहे

जाते खुळ्या जगी जी आभास कल्पनेच्या
कविता अजून माझी लयदार होत आहे 

शक्ती असीम आहे ह्या लेखणीत माझ्या
परजून ठेवता ती तलवार होत आहे !

२.

मुसळधार पाऊस धारा वगैरे
दिला वादळाने इशारा वगैरे

नदी आज नागीण होवून धावे
गुरे शोधताहे निवारा वगैरे

अरे आर्णवा तू अती रौद्र झाला
क्षणी ध्वस्त झाला किनारा वगैरे

वनी वल्लरी नाच मनसोक्त मोरा
फुलव ना तुझा तू पिसारा वगैरे

निरागस निराधार वंचित मुलांचा
अनाथालयी तू सहारा वगैरे

नवी पालवी बालपाने उगवता
दिसे खूप सुंदर नजारा वगैरै

भयाने भरे कापरे काळजाला
तसा गूढ वाटे पहारा वगैरे

नको घातकी हौस प्याला विषाचा
उगा व्यर्थ हा कोंडमारा वगैरे

विषाणू कसा हा जगा व्यापणारा
म्हणे तो चुकांना सुधारा वगैरे! 

........................
अलका कुलकर्णी
 9850253351 ..

No comments:

Post a Comment