दोन गझला : अश्विनी बोंडे



१.

एकटक का सारखा तू पाहतो माझ्याकडे
बाण का नजरेतले तू टाकतो माझ्याकडे

मी तळ्याकाठीच झुरते शब्द ऐकाया तुझे
तू लव्हाळे सारखे का फेकतो माझ्याकडे

गार वारा वाहतो पदरास माझ्या छेडतो
बेत प्रीतीचा तुझा बघ सांगतो माझ्याकडे

मोकळ्या केसात माझ्या गुंततो जादू जशी
लाजुनी मग चंद्र माझा पाहतो माझ्याकडे

बंद डोळे पाहतो अन् स्पर्शतो गालावरी
गंध प्रेमाचा सुखाने वाहतो माझ्याकडे

चांदण्यांना सांगते मी एवढे चमकू नका
आज रात्री चंद्र तुमचा नांदतो माझ्याकडे

भारलेली वेळ होती भारलेली स्पंदने
श्वास माझा ती मिठी का मागतो माझ्याकडे

२.

जाणिवेच्या भावनांनी वेढले मी
नेणिवेच्या यातनांना भोगले मी

चंदनाचे भावणारे शिल्प होते
त्यास मातीमोल येथे जाळले मी

श्रावणाचे गीत व्हाया चिंबणारे
तप्त वाळूच्या कणांनी पोळले मी

कर्मभावाला स्वतःच्या जागवाया
स्वाभिमानाला कधी ना सोडले मी

कार्य झाले थोर माझ्या गौरवाला
तसबिरीसाठी दिवारी टांगले मी

घाल माळा लाव ज्योती बांध पुतळे
माणसाच्या आत का रे थांबले मी?

घात झाला मी इथे संपून गेले
तारकांनी मंडपी तेजाळले मी
.......................
✍🏻अश्विनी बोंडे
ता. अकोट
जि. अकोला
7765925791

2 comments: