दोन गझला : सौ. विद्या देशमुख

१.

बीन बुडाचे लोटे झाले 
हात तयांचे थोटे झाले

देव म्हणूनी पुजले ज्यांना 
देवांचेही गोटे झाले

डोळ्यामध्ये मावत नाही
स्वप्न केवढे मोठे झाले

पूर्णत्वाला आले जेव्हा
बोल जगाचे खोटे झाले

नको नको ते बोलुन गेले
शब्द जालीम सोटे झाले

ट्रेंड बदलता बदलत गेले
वितभर हे पागोटे झाले

पायघोळ त्या अंगरख्याचे
झिजल्याने करगोटे झाले

मायेच्या खोप्यातच विरले
दुर्मिळ सागरगोटे झाले

२.

घर अंगणासवें उंबरठा फरार झाला
पाठीस भेदणारा घातक प्रहार झाला

हातात हात होते मायेत गुंफलेले
येताच वादळाने गुंता अपार झाला

मन पारखे सुखाला झाले जरा न कळले
गोठून भावनांचा नुसताच भार झाला

हलवून मूळ ,दुखरा बुंधा थरारला अन् 
भेदून काळजाला तिर आरपार झाला

वादंग पेलताना ओढून मुखवटा मग
खोटेच हासण्याचा खोटा करार झाला

आकाश फाटले वा भूमी दुभंगली ती
आक्रोश वेदनांचा त्या हद्दपार झाला

जमती बघे किती हे तोडावयास लचके
चोळून मीठ वरती म्हणती थरार झाला

No comments:

Post a Comment