तीन गझला : भागवत विजय देवकर

१.

ध्येय देखणे लोभस आहे
इच्छा बहुधा डोळस आहे

जीवनातल्या वाटेमध्ये
खरा अडथळा आळस आहे

दोष कुणाला नकोस देऊ
तुझे बियाणे बोगस आहे

सुख गोंधळले बघून येथे
दुःख केवढे सालस आहे

धूर दाटला जिकडेतिकडे
जगी एवढा आकस आहे

२.

फुटलेल्या पत्र्यांनी सारे गोळा केले
दिवसाढवळ्या घरात तारे गोळा केले

पडला आहे पाऊस कुठे मनासारखा
अंदाजाने नुसते वारे गोळा केले

पूर्तता कधी वचनाची तू केली नाही
जनतेनेही फुसके नारे गोळा केले

जमिनीमध्ये पाऊल घट्ट रोवत गेलो
कानामध्ये उनाड वारे गोळा केले

आयुष्याची चव राखण्यास कायम येथे
डोळ्यामध्ये अश्रू खारे गोळा केले

रस्ते,वळणे, मिठ्या मुके अन पत्रे तिकिटे...
आठवणीचे  तुझ्या पसारे गोळा केले

प्रेमळ, रागट,मादक बाधक आणिक चावट
नजरेने हे प्रकार न्यारे गोळा केले

अपयश आलेल्यांच्या गोष्टी वाचत गेलो
अनुभव पदरी मी म्हातारे गोळा केले

३.

जर स्वप्नातही तो आठवानी तळमळू शकतो
तो माणूस डोळ्यातील पाण्याने जळू शकतो

चुकचुकली जराशी पाल जर डोक्यात शंकेची
निर्णय घेत असताना कुणीही गोंधळू शकतो

आजी गोष्ट सांगे अस्वलाची का मला कळले
संकट येत असताना जवळचा ही पळू शकतो

वेगावर नियंत्रण ठेव आता आपुल्या वेड्या
बघ अपघात थोड्या सावधानीने टळू शकतो

फुटली वाळक्या खोडास नवती पाहिल्यावर तू
प्रेमाचा ऋतू देहात जख्खड सळसळू शकतो
......................
©भागवत देवकर

1 comment: