तीन गझला : रोहिणी पांडे

१.

वणवण सारी कोणासाठी किती फिरावे
पाण्यासाठी दाण्यासाठी किती फिरावे

तुझी आठवण उगाच येते कातरवेळी 
मृगजळ ठरल्या प्रेमासाठी किती फिरावे

दृष्टीहिन तर जग हे सारे डोळे असुनी
नको तेच ते बघण्यासाठी किती फिरावे

रणरणते उन करपते रान रवी कोपता
जरा गारवा जपण्यासाठी किती फिरावे

बागेमधली फुलेच सुकली उन्हाने जर
मकरंदाने गंधासाठी किती फिरावे
  
स्मशान भरले सरणही सरले स्वस्त मरणही
संपुन गेल्या सरणासाठी किती फिरावे

सुन्न मनाने वावरताना भरून आले
भरले डोळे,पुसण्यासाठी, किती फिरावे

२.

तुझ्या विना मुळात मी, जगायचे असे कसे
उन्हास सावली तुझी ,म्हणायचे असे कसे

उदास वाटते मला,  नसेल तो  जिथे जिथे
उधाण आठवातले, जपायचे असे कसे

तरारते धरा अशी, सहून गर्भ वेदना
तृणात प्राण ओतता, फुलायचे असे कसे

मला न आवडे तुझा,उदास चेहरा असा
हसून दाखवीत मी, बघायचे असे कसे
 
मलाच ठेच लागते,उगाच नेमकी तिथे
भरून घाव तू तिथे, दिसायचे असे कसे

हसायचे रडायचे, तुझ्या कुशित आज ही
तुझ्या शिवाय माउली,जगायचे असे कसे

उनाड पावसात त्या, शहारले किती किती
मिठीत स्पर्श जागता,झुरायचे असे कसे

अजाण भावना तिची,हुशार नाटकी सखा
सुरेख जाल टाकले,निघायचे असे कसे

अनाम साद सावळी, तुझीच येतसे मला
अधीर होत आज ही,पळायचे असे कसे

३.

श्वासामधुनी दरवळणारी तुझी आठवण
ध्यासामधुनी सळसळणारी तुझी आठवण

कधी स्मरणिका प्राजक्तासम सुगंधवेडी
अश्रूंमधुनी ओघळणारी तुझी आठवण

दुराव्यात ही अंतरात या तुझेच असणे
तरी आत का गोंधळणारी तुझी आठवण

भ्रमरासम तू मनात घालत असतो रुंजी
मनात माझ्या झुळझुळणारी तुझी आठवण

भास गुलाबी आणिक थोडे धुंद सोहळे
हास्यामध्ये विरघळणारी तुझी आठवण
........................

- रोहिणी पांडे (शब्द नक्षत्र)
 

1 comment:

  1. अतिशय अप्रतिम गझल आहेत तिन्ही
    अभिनंदन रोहिणी

    ReplyDelete