दोन गझला : मनोज सोनोने

१.

सोडून दूर जर का जाशील सावलीला.
परतून एकदिवशी येशील पायरीला.

शेरामधून माझ्या येईल गंध ताजा ;
तू दोष दे कितीही निष्पाप लेखणीला.

नावापुढे तुझ्या तू लावून घे उपाधी;
आमंत्रणे तुझ्याही येतील मग चुलीला.

गर्दी निघून गेली अन् भामटेच उरले;
गाऊ कशी गझल मी तू सांग मैफिलीला.

समजून दुःख जेंव्हा ना घेतले कुणीही;
तात्काळ ईश्वराने मग धाडले मुलीला.

ना चाळलास साधा इतिहास तू कधीही;
मारून लाथ बसला तू काल भाकरीला.

चोरुन गझल माझ्या काढून टाक संग्रह ;
पुसतोय कोण येथे या जीर्ण डायरीला.

२.

अर्थ त्याच्या जीवनाला फार नाही.
खणकणारा जो इथे कलदार नाही.

पेटती आत्म्यातली ही ज्योत आहे ;
सहजतेने एवढ्या विझणार नाही.

कर कितीही आज चेष्टा माकडा तू ;
फुकट लोणी खायला मिळणार नाही.

यज्ञ केला जाळला मी अहम माझा ;
आसवांनी पापणी थिजणार नाही.

दुःख माझे समजुनी तू घेतले तर ; 
काळजाला वेदना होणार नाही.

दे शिव्या वा हाण लाथा लाख वेळा ;
तोंड माझे हे तरी सुटणार नाही.

लाखदा सांगीतले होते तुला पण ;
शल्य माझे जन्मभर कळणार नाही.

शांत झाले एक वादळ आसमंती ;
शांतता का त्यासही मिळणार नाही.

लावली झाडे कितीदा काढले बिल 
कागदावर झाड पण जगणार नाही.
       
.......................
प्रा.मनोज सोनोने,
शेगांव.

No comments:

Post a Comment