१.
टाळे नव्हते, फक्त भरवसा होता आधी
अंधाराला पुरे कवडसा होता आधी.
सोडुन आलो पाय चालते त्या वाटेवर
ज्या वाटेवर अलगद वळसा होता आधी
बोल पावसा तू सुद्धा मिस करतो ना रे
तुझे बरसणे म्हणजे जलसा होता आधी
स्टेटस वरून कळले होते तिच्या मनीचे
हेच कळाया लागत अरसा होता आधी
उगाच नाही चाल हेलका घेत चालते
तिच्या कडेवर नक्की कळसा होता आधी
२.
झाले पुरे,कुणाचा आता लळा नको
गोत्यात आणणारा गोतावळा नको
इतका सराव झाला काट्यासवे मला
नाही,नको फुलांचा आता मळा नको
द्या द्यायचेच तर मग बळ द्या जगायला
तुमचा उधार खोटा मज कळवळा नको
माझ्या पराभवाची मज कारणे हवी
रडण्यास सांत्वनाला तुमचा गळा नको
नेउन स्वतःस केले गुपचूप मी दफन
माझ्या मरणविधीचा मज सोहळा नको
येऊ नको कधीही दारावरी सुखा
माझ्या घरी फुकाची ती अवकळा नको
त्यांनी समर्पणाला धरले तुझ्या गृहित
राधे कधी तरी म्हण 'मज सावळा नको'
संपेल वाट केव्हा चिंता मला न ही
चालायचा इरादा बस पांगळा नको
३.
कुठलाही त्रागा नाही कुठलीही अडचण नाही
जगण्याची सक्ती सोडून कुठलीही वणवण नाही
मी सुखात आहे माझ्या या पडक्या घरात येथे
इच्छांचे झुंबर अथवा गरजांचे तोरण नाही
मी सांग कसे ऐकावे माझेही म्हणणे आता
हा ताठ कणाही माझा जर मलाच तारण नाही
तो सांगत बसतो त्याची बंग्ला गाडी श्रीमंती
की लपवत असतो त्याच्या त्या घरास घरपण नाही
अश्रूंना माझ्यावाचुन का करमत नाही आता ?
ती सोडुन गेल्याचे तर तकलादू कारण नाही ?
तू रोज छतावर जाते अन् संध्याकाळी जाते
अन वरून म्हणते माझे चंद्राशी भांडण नाही
हे पाय इथे का हुंगत,रेंगाळत असती माझे
त्या जिथे सांडल्या भेटी,ही ती तर पांदण नाही !
....................................
अझीझखान पठाण
गाळा-टाईप ५/१२/०१,विद्युत विहार,
केटीपीएस कॉलोनी,कोराडी
जिल्हा-नागपूर.४४११११
दूरध्वनी ७८७५८९४३४३
No comments:
Post a Comment