तीन गझला : चेतन पवार

१.

पोट रिकामे रात्र रात्रभर सुध्दा जागू शकते
भूक तेवढी लाचारीने भाकर मागू शकते

मला भ्रमंती नावडती पण तुझ्याचसाठी राणी
मला नेमके तुझे पाखरू व्हावे लागू शकते

जितके मिळते तितक्यात सुखी राहू शकतो आपण
जशी दुधाची ताकावर पण तहान भागू शकते

प्रेमकहाणी जातींमध्ये इतकी बरबटते की
जगण्यापेक्षा मुलगा-मुलगी जीवन त्यागू शकते

एक बातमी यंदा येवो पेपरमध्ये देवा
'विधवा अपुल्या मनमर्जीने खुशाल वागू शकते'

२.

दोघांमधून एक निघाला,काय राहिले बाकी
फक्त राहिले शून्य, म्हणाला काय राहिले बाकी

कत्तल केली झाडांची अन घरे बांधली मोठी
झाडाजागी नुसता पाला,काय राहिले बाकी

आजाराने होते नव्हते सारे काही नेले
उरले कुंपण फक्त घराला,काय राहिले बाकी

पैशासाठी दगदग केली जगण्यासाठी मरमर
देह तरी राखेत मिळाला, काय राहिले बाकी

शेतीसाठी शेतकऱ्याने खिसे रिकामे केले
आणि शेवटी विष तो प्याला, काय राहिले बाकी

३.

गुलाब चाफा कधी जुई तर जाई होते
थकल्यानंतर कविता मग अंगाई होते

जीवन सुंदर आहे मित्रा जगून घेना
इतक्या लवकर का मरणाची घाई होते

कथा आमची लिहून ठेवा कुठेतरी ही
मी होतो कोरा कागद ती शाई होते

'मासिक पाळी' लाभच आहे विटाळ नाही
तिच्यामुळे तर बाईचीही आई होते

वारकऱ्याची वारी जेव्हा चुकते तेव्हा
घरीच विठ्ठल बाप माय रखुमाई होते

2 comments: